नवी दिल्ली : पॅन कार्ड हे आजच्या काळात महत्त्वाचे डॉक्युमेंट आहे. पॅन कार्डशिवाय आर्थिक व्यवहार होऊ शकत नाहीत. प्राप्तीकर विवरण भरण्यापासून ते बॅंक खाते उघडणे, व्यापार सुरू करणे, मालमत्ता खरेदी विक्री करणे यासाठी पॅन कार्ड अनिवार्य आहे.
एखाद्या कारणाने पॅनकार्ड हरवले तर ते अडचणीचे ठरू शकते, पण प्राप्तीकर विभागाने पॅन कार्डधारकांना इलेक्ट्रॉनिक पॅन कार्ड डाउनलोड करण्याची सुविधा प्रदान केली आहे. त्यामुळे आपले पॅन कार्ड हरवले असेल तर घाबरण्याची गरज नाही. घरबसल्या काही मिनिटातच ई पॅन कार्ड डाउनलोड करू शकता. बहुतांश आर्थिक संस्थांकडून अशा प्रकारच्या पॅन कार्डला मान्यता देण्यात आली आहे.
फोनमध्ये देखील ई-पॅन कार्ड बाळगू शकता. ही सुविधाजनक बाब आहे. पॅन कार्ड हा प्राप्तीकर विभागाकडून जारी केलेला दहा अंकी एक अल्फान्युमेरिक नंबर आहे. त्याचवेळी ई-पॅन हे एक व्हर्च्युअल पॅन कार्ड असून त्याची गरज भासल्यास ई-व्हेरिफिकेशनसाठी त्याचा उपयोग करता येऊ शकतो.
अर्थात प्राप्तीकर विभागाने नागरिकांना वेळोवेळी पॅन कार्ड सुरक्षित ठेवण्याबाबत सूचना दिल्या आहेत. तसेच अनोळखी व्यक्तींना माहिती शेअर न करण्याचे देखील सांगितले आहे. सध्या पॅन कार्डवरून खूपच गैरव्यवहार होत असून लोकांची फसवणूक देखील केली जात आहे. बोगस पॅन कार्डच्या आधारे कर्जही घेतले जात आहे. त्यामुळे त्याचा सांभाळ करणे खूपच अत्यावश्यक आहे.
पॅन कार्ड कसे डाऊनलोड करावे
* प्राप्तीकर खात्याच्या अधिकृत संकेतस्थळावर जावे (https://www.onlineservices.nsdl.com/paam/requestAndDownloadEPAN.html)
*या ठिकाणी ई-पॅन कार्ड ऑप्शनवर क्लिक करावे
*पॅन नंबर टाकावा
*आपल्याला आधार कार्ड नंबर टाकावा लागेल.
*जन्मतारीख नोंदवावी.
*अटी आणि शर्तीच्या ठिकाणी क्लिक करावे
*रजिस्टर्ड मोबाइल नंवर नोंदवावा
*नोंदणीकृत मोबाइलवर ओटीपी येईल
*कन्फरमेशन ऑप्शनवर क्लिक करावे
*ई-पॅनकार्ड डाउनलोड करण्यासाठी शुल्क भरावे
*हे शुल्क यूपीआय, डेबिट किंवा क्रेडिट कार्ड पेमेंटने भरू शकता.
*यानंतर आपण ई-पॅन डाउनलोड करू शकता
*ई-पॅनकार्डचा पीडीएफ डाऊनलोड करण्यासाठी जन्मतारखेचा पासवर्ड टाकावा लागेल. याप्रमाणे ई-पॅन डाउनलोड होईल.