नवी दिल्ली : देशात अगोदरच महागाईने सर्वसामान्य त्रस्त झाले आहेत. त्यातच आता आरबीआयने पुन्हा एकदा नागरिकांना महागाईचा झटका दिला आहे. आरबीआयने रेपो दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. आरबीआयच्या पतधोरण आढावा बैठकीत 50 बेसिस पॉईंटची वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. ही व्याज दरवाढ तात्काळ प्रभावाने लागू होणार असल्याचे आरबीआयचे गर्व्हनर शक्तिकांत दास यांनी सांगितले. आरबीआयच्या या निर्णयामुळे रेपो दर 5.40 टक्क्यांवर गेला आहे.
आरबीआयने रेपो दरात वाढ केल्याने गृह कर्ज, शैक्षणिक, वैयक्तिक, वाहन कर्ज महागणार आहे. आधीच महागाईशी दोन हात करत असलेल्या सामान्यांवर आणखी भार वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. व्याज दर वाढवल्याने बाजारातील खरेदीवर नियंत्रण येते. त्याच्या परिणामी मागणी आणि पुरवठ्याचे व्यस्त झालेले प्रमाण काही प्रमाणात संतुलित होते. त्यामुळे महागाईला आळा बसण्यास काही प्रमाणात मदत होते.
RBI raises repo rate by 50 bps to cool inflation, 3rd hike in row
Read @ANI Story | https://t.co/Rb1VCdGpHD#rbipolicy #RBI #RBIMPC pic.twitter.com/PHZDNvavje
— ANI Digital (@ani_digital) August 5, 2022
याआधी आरबीआयने मे 2022 मध्ये झालेल्या मॉनिटरी पॉलिसी बैठकीनंतर रेपो दरात 40 बेसिस पॉईंटची वाढ केली होती. त्यानंतर रेपो दर 4.40 टक्के झाला. त्यानंतर 8 जून 2022 मध्ये झालेल्या बैठकीनंतर रेपो दरात 50 बेसिस पॉईंटची वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर रेपो दर 4.90 टक्के इतका झाला. आरबीआयने एकाच महिन्यात जवळपास 90 बेसिस पॉईंटची वाढ केली होती.
रिझर्व्ह बँकेचे गर्व्हनर शक्तिकांत दास यांनी पत्रकार परिषद घेत मागील तीन दिवसांपासून सुरू असलेल्या पतधोरण आढावा बैठकीतील निर्णय सांगितले. शक्तिकांत दास यांनी सांगितले की, वर्ष 2022-23 मध्ये भारताचा जीडीपी 7.2 टक्के राहण्याचा अंदाज आहे. हा अंदाज आरबीआयने याआधीच वर्तवला होता. सध्या जागतिकीकरण आणि जागतिक अर्थव्यवस्थेवर मोठा दबाव असल्याचे दिसून येत असल्याचे शक्तिकांत दास यांनी सांगितले. भारतीय अर्थव्यवस्थेवर याचा परिणाम होत आहे. देशातील महागाईच्या मुद्यावर चिंता कायम असल्याचेही त्यांनी सांगितले. आरबीआयने रेपो दरात वाढ करण्यासह एसडीएफच्या दरात वाढ केली आहे. एसडीएफ दर 5.15 टक्के असणार आहे. याआधी एसडीएफ दर 4.65 टक्के होता.
मान्सून सामान्य राहिल्यास आणि कच्च्या तेलाच्या किंमती 105 डॉलर प्रति बॅरल राहिल्यास चालू आर्थिक वर्षात महागाई दर 6.7 टक्के राहण्याचा अंदाज असल्याचे आरबीआय गर्व्हनर शक्तिकांत दास यांनी सांगितले. सध्या महागाई कमी होताना दिसत आहे. मान्सून सामान्यपेक्षा चांगला होत आहे. त्याचे परिणामही दिसत आहेत. मात्र, पुराचा फटका बसल्यास महागाईत वाढ होण्याची शक्यता असल्याचे त्यांनी सांगितले. येत्या काही दिवसात खाद्य तेलाच्या किंमतीही कमी होणार असल्याचे त्यांनी सांगितले.