पिंपरी – पिंपरी चिंचवड शहरातील माजी सैनिकांचा मिळकतकर माफ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार शहरातील माजी सैनिकांचा मिळकतकर माफ करण्यास सुरूवात करण्यात आली आहे. या योजनेचा फायदा शहरातील तब्बल पाच हजार माजी सैनिकांना होणार आहे.
महाराष्ट्र राज्य शासनाच्या बाळासाहेब ठाकरे माजी सैनिक व त्यांच्या विधवा पत्नीला मालमत्ता कर माफी योजना जाहीर केली आहे. त्या अंतर्गत महापालिकेच्या करसंकलन विभागाने शहरातील माजी सैनिकांचा कर माफ करण्याचा निर्णय घेतला आहे. या योजनेमुळे माजी सैनिक व त्यांच्या विधवा पत्नीच्या नावे असलेल्या मिळकतीवरील 100 टक्के मिळकतकर माफ केला जात आहे. पालिकेच्या वतीने शहरातील माजी सैनिक व त्यांच्या विधवा पत्नी, तसेच शौर्यपदक विजेत्यांना मिळकतकरातील सामान्य करात 50 टक्के सूट दिली जात होती. त्याचा लाभ दरवर्षी शहरातील 4 हजार 500 माजी सैनिक घेत होते.
नव्या योजनेनुसार पात्र ठरलेल्या माजी सैनिकांना सामान्य कर, मलप्रवाह सुविधा लाभ कर, पाणीपुरवठा लाभ कर आणि रस्ता कर यामध्ये 100 टक्के सूट देण्यात आली आहे. मात्र वृक्ष कर, शिक्षण कर, महापालिका शास्ती व प्रशासकीय सेवा शुल्क भरावा लागणार आहे. ती रक्कम मात्र नाममात्र असणार आहे.
माजी सैनिकांना संपूर्ण मिळकतकर माफीसाठी मिळकतधारकांस सैनिक निवृत्तीवेतनाचा दाखला किंवा जिल्हा सैनिक कल्याण अधिकाऱ्यांचे प्रमाणपत्र सादर करावे लागणार आहे. प्रथम मिळकतकराचे संपूर्ण बिल भरावे लागणार आहे. माफीनुसार उर्वरित रक्कम परत केली जाणार आहे. ही सूट सन 2020-21 या वर्षातील बिलावर मिळणार आहे. थकबाकी असल्यास त्यावर सूट मिळणार नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
पिंपरी चिंचवड शहरातील सर्व माजी सैनिकांनी संपूर्ण मिळकतकर भरून माफी देण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. त्यासाठी सैनिक निवृत्तीवेतनाचा दाखला सादर करावा लागणार आहे. त्यासोबतच जिल्हा सैनिक कल्याण अधिकाऱ्यांचे प्रमाणपत्र आवश्यक आहे. संबंधितांनी आपल्या भागातील करसंकलन कार्यालयाशी संपर्क साधून या योजनेचा लाभ घ्यावा.
– स्मिता झगडे, उपायुक्त, कर संकलन विभाग.