लंडन – स्पेनचा स्टार टेनिसपटू राफेल नदालने एटीपी फायनल्स 2020 स्पर्धेतील पुरुष एकेरीच्या शेवटच्या साखळी फेरीच्या सामन्यात गुरुवारी(१९ नोव्हेंबर) रात्री पाचव्या मानांकित आणि गतविजेत्या स्टिफानोस त्सित्सिपासचा पराभव करत उपांत्य फेरी गाठली. आता नदालचा उपांत्य फेरीत रशियाच्या डॅनिल मेदवेदेवशी सामना होईल. हा सामना शनिवारी(२१ नोव्हेंबर) होणार आहे.
दुसऱ्या मानांकित नदालने ग्रीसच्या त्सित्सिपासला 6-4, 4-6, 6-2 अशा फरकाने तीन सेटमध्ये पराभूत करत विजय साकारला. ही लढत 2 तास 4 मिनिटे चालली. विशेष म्हणजे नदालने मागील पाच वर्षांत प्रथमच एटीपी फायनल्सच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. आपल्या कारकिर्दित 20 ग्रँडस्लॅम जिंकणारा नदाल अजून एकदाही एटीपी फायनल्सचे विजेतेपद मिळवू शकलेला नाही. याआधी त्याने 2010 आणि 2013 ला अंतिम फेरीत प्रवेश केला होता. पण त्याला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते.
22 वर्षीय त्सित्सिपासने मागील वर्षी पहिल्यादांच याच स्पर्धेत सहभाग घेतला होता आणि ही स्पर्धा जिंकली होती. पण, यंदाच्या स्पर्धेत त्याला साखळी फेरीतच बाद व्हावे लागले. तसेच दुसरीकडे गुरूवारी झालेल्या सामन्यात आंद्रे रूबलेवने अमेरिकेच्या डाॅमिनिक थीमचा 6-2, 7-5 असा पराभव केला, पण या निकालाचा दोन्ही खेळाडूंवर काहीही परिणाम होणार नाही कारण थीम ने पहिल्या झालेल्या दोन सामन्यात स्टिफानोस त्सित्सिपास आणि नदाल याचा पराभव करत उपांत्यफेरीतील आपलं स्थान निश्चित केलं आहे. आता शुक्रवारी नोवाक जिकोवीच आणि अॅलेक्झांडर ज्वेरेव यांच्यात शु्क्रवारी सामना होणार आहे. या सामन्यातील विजेत्याशी थीमचा पुढील सामना होईल.