पुणे (संजय कडू) – सदनिकेच्या व्यवहारात फसवणूक झाल्याने एका समाजसेवकाने बांधकाम व्यवसायीकाविरोधात गुन्हा दाखल केला होता. या गुन्हयात जामिनावर सुटल्यावर बांधकाम व्यवसायीकाने समाज सेवकाला अद्दल घडविण्याचा डाव रचला.
यासाठी त्याने काही मध्यस्थांमार्फत समाजसेवकाच्या गाडीत गांजा ठेवला. यानंतर याची खबर एका पेड खबऱ्यामार्फत पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी सापळा रचून समाजसेवकास गांजासहीत ताब्यात घेतले. मात्र खबऱ्या सातत्याने पोलिसांकडे कारवाईचा आढावा घेत होता. नेमकी तेथेच पोलिसांच्या मनात पाल चुकचुकली.
यानंतर तपासाची चक्रे उलट दिशेने फिरवून खबऱ्याला ताब्यात घेण्यात आले. त्याला पोलिसी खाक्या दाखवताच त्याने बांधकाम व्यवसायीकाचा प्लॅन उघड केला. पोलिसांनी संबंधीत बांधकाम व्यवसायीक आणी खबऱ्यासहीत तीघांवर विश्रांतवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. नार्कोटीक्स सारख्या गंभीर गुन्हयात अडकता अडकता वाचल्याने समाजसेवकाने पोलिसांच्या रुपाने देवच भेटला, हीच माझी दिवाळी म्हणत पोलिसांचे आभार मानले.
बांधकाम व्यवसायीक किशोर पाटील(पोरवाल रस्ता, लोहगाव), मिटू रमेश सोनवणे(भिमनगर, विश्रांतवाडी) व किशोर बापू मोटे(दोघेही रा.भिमनगर, विश्रांतवाडी) अशी आरोपींची नावे आहेत. यातील मिटू आणी किशोर दोघेही सराईत गुन्हेगार आहेत. या दोघांवरही शरीराविरुद्दचे गुन्हे दाखल आहेत. या तीघांवरही समाजसेवकाच्या गाडीत दोन किलो गांजा ठेवल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यासंदर्भात माहिती देताना विश्रांतवाडी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक रविंद्र कदम यांनी सांगितले. किशोर पाटील हा बांधकाम व्यवसायीक आहे. तर काशिनाथ जाधव(46,रा.बोपखेल) यांची एक सामाजीक संस्था आहे. काशिनाथ यांनी किशोरकडून एक सदनिका खरेदी केली होती.
या सदनिकेच्या व्यवहारात त्यांची फसवणूक झाली. यामुळे त्यांनी खडकी पोलिस ठाण्यात किशोरविरुध्द तक्रार दाखल केली. या गुन्ह्यात किशोरला शिक्षा झाली. करोनाच्या पार्श्वभूमीवर किशोर हा तात्पुरत्या जामिनावर बाहेर आला आहे. त्याने बदला घेण्यासाठी एक प्लॅन तयार केला. त्यानूसार त्याने दोन सराईत गुन्हेगारांना बोलावून घेतले.
त्या प्लॅननूसार त्याने समाजसेवकाच्या कारमध्ये गांजा ठेऊन त्याच्यावर नार्कोटीक्स अंतर्गत गुन्हा दाखल करायचा असे ठरवले. त्यानूसार मिटू व किशोर यांना काशिनाथ यांच्या कारमध्ये गांजा ठेवण्यास सांगितले. गांजा ठेवल्यानंतर यातील एकाने पोलिसांना खबर दिली की, एक होंडा सिटी कार गांजाची वाहतूक करत आहे.
ती थोड्याच वेळात विश्रांतवाडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत येणार आहे. त्यानूसार विश्रांतवाडी पोलिसांनी तपास पथकाचे पोलिस उपनिरीक्षक लहू सातपुते व इतरांची पथके बनवून बोपखेल येथे सापळा रचून काशिनाथ यांची गाडी अडवली. या गाडीत काशिनाथ सोबत त्यांचा मित्र पाटीलही होता. दोघांनाही कळेना पोलिसांनी गाडी का अडवली. पोलिसांनी गाडीची झडती घेतल्यावर त्यांना मागे गांजाचे बोंड असलेली पॅकेट आढळली.
यामुळे काशिनाथ यांना धक्काच बसला. त्यांनी पोलिसांना आपल्या गाडीत असे काही असेल याची कल्पना नसल्याचे सांगितले. मात्र पोलिसांनी गांजा रंगेहाथ पकडल्याने दोघांनाही ताब्यात घेऊन पोलिस ठाण्यात आणण्यात आले. त्यांची चौकशी सुरु असताना, यातील खबऱ्या सातत्याने पोलिसांना फोन करुन माहिती घेत होता.
काशिनाथ यांच्याकडून मिळत असलेली माहिती आणी खबऱ्याचा सातत्याने पाठपुरावा लक्षात घेता, पोलिसांना खबऱ्याचा संशय आला. त्यांनी खबऱ्यास बोलावून घेत त्याची चौकशी सुरु केली.
तर दुसरीकडे त्याचे मोबाइर्लचे कॉल डिटेल्स काढण्यात आले. या कॉल डिडेल्सवरुन मिळालेल्या माहितीनूसार खबऱ्यावर आणखी संशय बळावला. त्याला पोलिसी खाक्या दाखवताच त्याने किशोर पाटीलकडून एक लाख रुपये घेऊन गांजा काशिनाथ यांच्या गाडीत ठेवल्याचे कबुल केले. त्यानूसार किशोरसह तीघांवर गुन्हा दाखल करण्यात आला.