जीवनगाणे: देई क्षमेचे दान

अरुण गोखले

भगवान महावीरांनी जो बहुमोल असा जीवन संदेश दिलेला आहे त्यात त्यांनी तीन गोष्टी अवश्‍य करा म्हणून सांगितले आहे. एक जप, दुसरे तप आणि तिसरे दान. या तिसऱ्या दानाच्या संदर्भात त्यांनी क्षमादान करा, असाही सल्ला दिलेला आहे.

खरोखरच इतर कोणतीही दान उदा. धनदान, विद्यादान, अन्नदान, वस्त्रदान, भूदान यासारख्या गोष्टी दान करायच्या म्हटले, तर त्या गोष्टी आपल्याकडे विपुलतेने असणे आवश्‍यक असते. तरच आपण त्या गोष्टी इतरांना दान म्हणून देऊ शकतो. व्यक्‍ती धनाढ्य असेल तरच त्याला धनदान करणे शक्‍य होईल. जो स्वत: संपूर्ण विद्या पारंगत असेल तोच इतरांना ती विद्या देऊ शकेल. ज्याच्याकडे भरपूर जमीन असेल तोच भूदानाचे पुण्य पदरी जोडू शकेल. पण ज्याच्याकडे यातले काही नाही अशा सर्वसामान्य व्यक्‍ती असं कोणतं दान करू शकते? की ज्याने तो पुण्य पदरी जोडू शकतो. ह्याचं उत्तर देताना भगवान महावीरांनी सांगून ठेवले आहे की, “बाबारे! तुझ्याकडे धन, विद्या, जमीनजुमला, वस्त्रालंकार ह्यातलं काहीही नसलं तरी एक गोष्ट तुझ्याकडे निश्‍चित आहे, ती म्हणजे तुझे उदार मन. त्या उदार मनाने तुझ्यावर अन्याय करणाऱ्या, तुला पीडा देणाऱ्या, तुझं अनहित चिंतणाऱ्या, प्रसंगी तुझ्या जीवावर उठलेल्यालाही तू उदार मनाने क्षमा कर.

त्याचे अपराध पोटात घाल. त्याचा राग, तिरस्कार, अवहेलना किंवा त्याला शासन करण्याचा विचार तुझ्या मनात आणू नकोस. त्याचं कर्म त्याच्या पाशी, तू तुझं माणुसकीच, क्षमादानाच कर्म कर.’ या क्षमादानाच मोल ते काय आणि किती म्हणून सांगावे? क्षमा मागण्यासाठी आधी अपराधीपणाची, चूक केल्याची, अयोग्य वर्तनाची जाणीव व्हावी लागते. जे केले, करतोय ते चुकीचे आहे हे लक्षात यावे लागते. आपल्या हिताची वाट आपल्याला माहीत असावी लागते. अशाच माणसाला क्षमा याचना मागायची उपरती होते. त्या क्षमेच्या याचनेनेच त्याचे कल्याण होते. त्या क्षमायाचनेच्या बदल्यात ते क्षमेचे दान त्याला निर्भय करते, त्याला सन्मार्गाला लावते, त्याचा उद्धार करते. त्याच्यात वैचारिक परिवर्तन घडवून पापी, दुराचारी, अधम यांचा उद्धार घडवते. क्षमा ही गोष्ट आहे की ती प्रत्येकाच्या जवळ आहेच. ती कोठून बाहेरून मिळवायची किंवा जोडायची ठेव नाही, ती एक ईश्‍वरी अक्षय देणगी आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here