मुंबई – मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टील अष्टपैलू अभिनेते ‘सयाजी शिंदे’ यांच्या संकल्पनेतून पुढे आलेले पहिले वृक्ष संमेलन मराठवाड्यातील बीड जिल्ह्यात होणार आहे. दिनांक 13 आणि 14 फेब्रुवारी रोजी पालवन, बीड येथे वृक्ष संमेलन पार पडणार आहे. हे वृक्ष संमेलन केवळ महाराष्ट्रातीलच नव्हे तर संपूर्ण देशातील पहिले वृक्ष संमेलन असणार आहे.
या संमेलनासाठी सह्याद्री देवराईचे प्रणेते आणि सयाजी शिंदे दिवस-रात्र मेहनत घेत आहेत. इथल्या प्रत्येक हालचालीवर सयाजी शिंदे हे बारकाईने लक्ष ठेवून आहेत. सयाजींनी तीन वर्षापूर्वी याच पालवनच्या उजाड माळरानावर चिल्यापिल्यांना सोबत घेऊन हजारो वृक्षांची लागवड केली. ती रोपटी आता मोठे वृक्ष बनून मानाने डोलत आहेत. याच वृक्षांच्या पायथ्याशी राज्यातील हजारो वृक्षमित्र जमणार आहेत.