गर्दीवर नियंत्रणाचे पहिले पाऊल; पीएमपीच्या प्रवासी संख्येवर मर्यादा

जितक्‍या सीट्‌स तितक्‍याच प्रवाशांना परवानगी


बसमध्ये उभे राहून प्रवास करण्यास सरसकट बंदी

पुणे – करोना बाधितांची वाढती संख्या लक्षात घेऊन महापालिकेने गर्दीवर नियंत्रण आणण्यास सुरूवात केली आहे. त्याची सुरुवात दैनंदिन 5 ते 7 लाख प्रवासी संख्या असलेल्या पीएमपीपासून करण्यात आली आहे. प्रशासनाच्या सूचनेनुसार पीएमपीने बसमधील प्रवासी संख्येवर मर्यादा आणण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे बसमध्ये जेवढी आसने आहेत, तितक्‍याच प्रवाशांना प्रवेश दिला जाणार आहे. उभे राहून प्रवास करण्यास सरसकट मनाई करण्यात आली आहे. शनिवारपासून या निर्णयाची अंमलबजावणी केली जाणार आहे.

पीएमपीचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. राजेंद्र जगताप यांनी याबाबतचे आदेश दिले आहेत. शहरात करोनाबाधित वाढत असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून सार्वजनिक प्रवासी वाहतुकीबाबत दक्षता घेण्याच्या सूचना महापालिका आयुक्‍तांनी पीएमपी व्यवस्थापनाला दिल्या आहेत. त्यानुसार, पीएमपी प्रशासनाने बसमधून प्रवास करण्याऱ्या प्रवाशांच्या संख्येवर मर्यादा आणण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भातील सूचना सर्व आगार प्रमुखांना देण्यात आल्या आहेत. या सूचनांचे पालन करण्याची जबाबदारी स्थानक व्यवस्थापक आणि चालक-वाहक आणि तपासणी अधिकारी यांच्यावर असेल.

बसेसची संख्या वाढवणार
पीएमपीची प्रवासी संख्या दैनंदिन सात लाखांच्या आसपास आहे. शिवाय अटल बस सेवादेखील सुरू आहे. शाळा आणि महाविद्यालये सुरू झालेली आहेत. त्यामुळ बसमधील गर्दी वाढलेली आहे. पीएमपीकडून सध्या 1,400 बसेस दैनंदिन संचलनात आहेत. मात्र, आता प्रवाशांना केवळ बसून प्रवास करावा लागणार आहे. ही प्रवासी संख्या लक्षात घेऊन जादा बसेसची सुविधा प्रवाशांना उपलब्ध करून देण्याचे नियोजन सुरू आहे. त्यासाठी गर्दीच्या वेळेत बसेस वाढवल्या जातील.

पीएमपी बसमध्ये प्रवाशांच्या सुरक्षेसाठीच्या आवश्‍यक सुविधा दिलेल्या आहेत. या निर्णयामुळे स्थानकांवर प्रवाशांची गर्दी होणार आहे. ही बाब लक्षात घेऊन सोमवारपासून गर्दीच्या वेळी आणखी 100 जादा बस उपलब्ध करून देण्याचे नियोजन सुरू आहे. प्रवाशांना कोणताही त्रास होणार नाही याची खबरदारी घेतली जाईल. तसेच करोना प्रसार होणार नाही, यासाठी सक्षमपणे उपाययोजना केल्या जातील.
– डॉ. राजेंद्र जगताप, अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक, पीएमपीएमएल

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.