मुंबई – बॉलीवूड अभिनेता रणवीर सिंह हा आपल्या आगामी अनेक प्रोजेक्टमुळे व्यस्त असून तो प्रसिद्धीच्या झोतात आहे. आता आगामी “सर्कस’ चित्रपट यंदाच्या वर्षाअखेर म्हणजे 31 डिसेंबरला रिलीज होणार आहे. रोहित शेट्टीच्या या चित्रपटात रणवीरची पत्नी आणि अभिनेत्री दीपिका पादुकोणही झळकणार आहे.
यापूर्वी दीपिका आणि रणवीरची जोडी “बाजीराव मस्तानी’ आणि “गोलियों की रासलीला राम-लीला’ या चित्रपटांमध्ये पाहावयास मिळाली होती. या जोडीला चाहत्यांनी खूपच पसंती दर्शविली होती. आता ती जोडी पुन्हा एकदा “सर्कस’मध्ये रोमांस करताना दिसून येणार आहे. या चित्रपटात दीपिका एक खास रोल साकारत आहे. 2019मध्ये विवाहबद्ध झाल्यानंतर रणवीर आणि दीपिका दुसऱ्यांदा एकत्रित काम करत आहे.
रिलायन्स एंटरटेन्मेंटच्या बॅनरखाली टी-सीरीजच्या सहयोगाने “सर्कस’ चित्रपटाची निर्मिती करण्यात येत आहे. याचे दिग्दर्शन रोहित शेट्टी करत असून आता दीपिकाही यात काम करत असल्याने चित्रपटाबाबत चाहत्यांमधील उत्सुकता वाढली आहे.
यात रणवीर सिंह हा पहिल्यांदाच डबल रोलची भूमिका साकारताना पाहावयास मिळणार आहे. या दोघांसह को-स्टार वरुण शर्मादेखील डबल रोल साकारणार आहे. हा चित्रपट विलियम शेक्सपियरच्या “द कॉमेडी ऑफ एरर्स’ या नाटकावर आधारित असणार आहे.