महाबळेश्वर -रांजणवाडी पाठोपाठ आता महाबळेश्वरमधील दाट लोकवस्ती असलेल्या गवळी आळीजवळच्या पालिका कर्मचारी सोसायटीत करोनाचा पहिला रुग्ण आढळला आहे. प्रमुख अधिकाय्यांनी या भागाची पाहणी करून प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरू केल्या आहेत. तालुक्यात करोनाबाधितांची एकूण संख्या आता 108 झाली आहे.
महाबळेश्वर शहर आतापर्यंत करोनामुक्त होते. शहरापासून दोन किमी अंतरावरील रांजणवाडीत करोनाबाधित रुग्ण आढळले तरी प्रत्यक्ष शहरात करोनाचा शिरकाव झाला नव्हता. शहराच्या गवळी आळीजवळ पालिका कर्मचारी सोसायटीतील एका महिलेला “सारी’मुळे सातारा येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. तेथे तिची रॅपिड ऍन्टीजेन टेस्ट घेण्यात आली. त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने शहरात चिंतेचे वातावरण आहे.
उपनगराध्यक्ष अफजल सुतार, माजी नगराध्यक्ष युसूफ शेख, तहसीलदार सुषमा चौधरी-पाटील, पालिकेच्या मुख्याधिकारी पल्लवी भोरे-पाटील, पोलीस निरीक्षक बी. ए. कोंडुभैरी यांनी या परिसराची पाहणी करून महसूल विभाग, पालिका व पोलीस कर्मचाऱ्यांना व बाधिताच्या कुटुंबीयांना खबरदारीच्या सूचना दिल्या. पालिका कर्मचारी सोसायटीचा काही भाग सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आला असून या भागात चौदा दिवस नाकाबंदी करण्यात येणार आहे.
महाबळेश्वरप्रमाणे पाचगणीतही आज करोनाचे पाच रुग्ण आढळले आहेत. सध्या तालुक्यातील 44 रुग्णांवर महाबळेश्वर व पाचगणीतील कोव्हिड रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तालुक्यात आतापर्यंत 61 जण करोनामुक्त झाले असून तिघांचा मृत्यू झाला आहे.
प्रतिबंधित क्षेत्र असलेल्या गोडवलीत स्थानिकांसाठी रॅपिड ऍन्टीजेन तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. महाबळेश्वर येथील सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्रातील आणि रांजणवाडी येथील नागरिकांच्या तपासणीची मोहीम हाती घेण्यात येणार असल्याचे मुख्याधिकाऱ्यांनी सांगितले.