शिराळा (प्रतिनिधी) : सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यातील मणदुर गाव ग्रामस्थ, आरोग्य विभाग व प्रशासनाच्या समन्वयामुळे कोरोनाचा हाॅटस्पाॅट ठरलेले कोरोनामुक्त करण्यात यश आले आहे. मणदुर गावचा आदर्श संपुर्ण महाराष्ट्रात घेऊन मणदुर पॅटर्न राबविणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन खासदार-धैर्यशील माने यांनी केले.
मणदुर येथे कोरोनासंदर्भात घेण्यात आलेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते. खासदार माने म्हणाले, मणदुर गावामध्ये कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर तो वाढू नये. यासाठी प्रशासनाच्यावतीने हे गाव लाॅकडाऊन करण्यात आले होते. लाॅकडाऊनच्या कालावधीत कोरोनाची साखळी तोडण्यासाठी पोलीस प्रशासन, आरोग्य विभाग, गावातील आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका, मदतनीस, स्वयंसेवक व ग्रामपंचायतीने काटेकोर अंमलबजावणी केली. ग्रामस्थांनी ही त्यांना चांगले सहकार्य केले. त्यामुळे मणदुर हे गाव कोरोनामुक्त झाले. सर्वांचे काम कौतुकास्पद असल्याचेही त्यांनी सांगीतले.
आज तहसील कार्यालयात खासदार धौर्यशील माने यांच्या प्रमुख उपस्थितीत शिराळा तालुक्यातील कोरोना विषाणू संसर्गाबाबत केल्या जाणाऱ्या उपाय योजनांबाबत आढावा बैठक झाली. आमदार मानसिंगराव नाईक, माजी आमदार शिवाजीराव नाईक, तहसीलदार गणेश शिंदे, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सत्यजीत देशमुख, जिल्हा परिषद सदस्य संपतराव देशमुख, माजी जिल्हा परिषद सदस्य अभिजीत पाटील, तालुक्याचे माजी सभापती, प. स. सदस्य सम्राटसिंग नाईक, माजी सभापती हणमंत पाटील, भाजपा तालुकाध्यक्ष सुखदेव पाटील, गट विकास अधिकारी डॉ.अनिल बागल, शिराळा नगरपंचायत मुख्याधिकारी योगेश पाटील, नगराध्यक्षा अर्चना शेटे, वैद्यकीय अधिकारी डॉ. विलास रावळ, शिवसेना तालुका अध्यक्ष संतोष हिरुगडे प्रमुख उपस्थिती होते.