बारामती (प्रतिनिधी) – केंद्र सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाकडून दिल्या जाणाऱ्या राष्ट्रीय पुरस्कारांच्या विजेत्यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. हे राष्ट्रीय पुरस्कारांचं यंदाचं ६७ वे वर्ष आहे. ‘स्पेशल मेंशन’ विभागातून ‘लता भगवान करे’ या चित्रपटाला पुरस्कार जाहीर झाला आहे.
कोण आहेत लता भगवान करे ?
लता भगवान करे या बारामतीच्या रहिवाशी असून, त्यांनी वयाच्या ६५ व्या वर्षी पती आजारी असल्याने त्यांच्या इलाजासाठी ‘मॅरेथॉन’ या धावण्याच्या स्पर्धेत सहभाग घेतला होता. या स्पर्धेच्या त्या विजेत्यादेखील ठरल्या. या साऱ्या संघर्षावर सदर चित्रपट नवीन कुमार या तेलुगू भाषिक दिग्दर्शकानं मराठी भाषेत चित्रपट बनविला आहे. याच चित्रपटात स्वतः ‘लता’ प्रमुख भूमिकेत आहेत.
लता भगवान करे मूळच्या बुलढाणा जिल्ह्याच्या रहिवासी आहेत. परंतु काही कारणास्तव त्या बारामतीमध्येच स्थायिक झाल्या. मोलमजुरी करून त्या आपलं जीवन जगत होत्या. पण अचानक एक दिवस त्यांचे पती भगवान करे यांच्या छातीत दुखू लागल्याने त्यांना हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्यात आलं. त्यांच्या छातीचा एम.आर. ए. करण्यासाठी त्यांच्याजवळ पाच हजार रुपये नव्हते. त्याचवेळी बारामतीमध्ये मॅरेथॉन स्पर्धेच आयोजन करण्यात आलं आहे आणि विजेत्याला पाच हजार रुपये बक्षीस देणार असल्याचंही त्यांना समजलं.
वयाच्या ६५ व्या वर्षी लता आजीने तीन किलोमीटर हे अंतर विना चप्पल पार केलं आणि या स्पर्धेच्या त्या विजेता ठरल्या. पुढं त्यांनी अनेक स्पर्धेत सहभाग घेतला. यामुळे त्यांना अनेक जण ओळखू लागले. हा संपूर्ण प्रवास लता भगवान करे या चित्रपटातून दाखवण्यात आला आहे