पक्ष्यांच्या किलबिलाटाने होतेय दिवसाची सुरवात
पिंपरी – लक्ष्मीनगर, चिंचवड येथे महापालिकेने “जंगल थीम’ नुसार उद्यानाची उभारणी केली आहे. येथील झाडांची आता मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. या झाडांवर पक्षांनी आपली घरटीही तयार केली आहे. यामुळे लक्ष्मीनगर वासियांच्या दिवसाची सुरुवात आता पक्ष्यांच्या किलबिलाटाने होत आहे.
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या उद्यान विभागाने लक्ष्मी नगर, चिंचवड या ठिकाणी आरक्षित दोन एकर जागेत उद्यानाची निमिर्ती केली आहे. विशेष म्हणजे इतर उद्यानाप्रमाणे या उद्यानाचा विकास न करता जंगल थील राबविण्यात आली आहे. दोन एकरच्या जागेत तब्बल अडीच हजार देशी वृक्षांची लागवड या उद्यानात करण्यात आली आहे.
नदीलगत हे उद्यान असून सुरुवातीला तीन वर्ष या झाडांची काळजी घेण्यात येणार आहे. त्यानंतर झाडांना पाणी घालण्याची आवश्यकता नसते. मात्र सुरवातीच्या काळापासूनच महापालिकेने येथील झाडांची काळजी योग्य पद्धतीने घेतली आहे. त्यामुळे आता झाडे 12 ते 20 फूटांपर्यंत वाढली आहेत.
या झाडांवर पक्षांनी आपली घरटीही बांधली असून पहाटेपासून या भागातील रहिवांशांना पक्षांचा किलबिलाट ऐकू येतो. तसेच काही भागात गवताचे लॉन तयार करण्यात आले असून त्या ठिकाणी नागरिक योगाही करतात. ठिकठिकाणी नागरिकांना बसण्यासाठी बाकडेही ठेवण्यात आले आहेत. या उद्यानात झाडांची संख्या जादा असल्याने या पार्कला ऑक्सिजन पार्क म्हणूनही ओळखले जाते.
या उद्यानात जंगलाप्रमाणे दाटीवाटीने झाडे लावण्यात आली आहेत. तसेच या पार्कच्या बाजूने आणि मध्यभागी चालण्यासाठी जॉगिंग ट्रॅक ठेवल्यामुळे या परिसरातील नागरिक सकाळ-सायंकाळी चालण्यासाठी येत असतात. चालताना नागरिकांना जंगलातून चालल्याचा आनंद मिळतो.
– राजेंद्र गावडे, नगरसेवक.