यवत येथे खाद्यतेल गोदामाला भीषण आग

यवत – दौंड तालुक्यातील यवत येथे ‘तांबोळी इंटरप्राईजेस’ नावाच्या खाद्यतेल व आदी वस्तूंच्या गोदामाला आग लागल्याची घटना आज (दि.२३) मार्च रोजी मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेत तांबोळी इंटरप्राईजेसचे मालक आरीफ अब्दुलभाई तांबोळी (वय ४५ वर्षे, ता. दौंड) यांचे ५० लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. ही आग शॉर्टसर्किटमुळे लागल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

आरीफ तांबोळी यांचे तांबोळी इंटरप्राईजेस नावाचे यवत येथे किराणा माल साठवण्याचे गुलाम आहे. तांबोळी हे किराणा मालाचे होलसेल डीलर असून त्यांनी या गोदामात मोठ्या प्रमाणात खाद्यतेल, आटा, बेसन, मसाला, पापड यांच्यासह आदी सामानाचा या गोदामात साठा करून ठेवला होता. रात्री अचानक दीड वाजण्याच्या सुमारास या गोदामाला आग लागली. दरम्यान यवत येथे पोलीस ठाण्यातील पोलीस हे रात्रगस्त घालत असताना या गोदामातून मोठ्या प्रमाणात धूर निघत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी यवतचे सरपंच समीर दोरगे यांना संपर्क करून घटनेची माहिती दिली.

दोरगे यांनी गोदामाचे मालक आरीफ तांबोळी यांना माहिती दिल्यावर त्यांनी गोदामाकडे धाव घेतली. तोपर्यंत खाद्यतेलाचा साठा असल्याने ही आग मोठ्या प्रमाणात भडकली होती. त्यानंतर तात्काळ दौंड नगरपरिषदेचा व कुरकुंभ एमआयडीसीचा असे दोन अग्निशमन दलाचे बंब पाचारण करण्यात आले. हे बंब पहाटे साडेतीन वाजेच्या सुमारास घटनास्थळी दाखल होत पहाटे ५ वाजण्याच्या दरम्यान लागलेली आग आटोक्यात आणली.

मात्र तोपर्यंत गोदामातील सर्व खाद्यतेल व आदी सामान आगीच्या भक्ष्यस्थानी पडले होते. ही आग शॉर्टसर्किटमुळे लागल्याची शक्यता वर्तवण्यात येत असून या आगीत मात्र तांबोळी यांचे जवळपास ५९ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.