पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने महिला बचत गटांनी उत्पादित केलेल्या वस्तूंना बाजारपेठ उपलब्ध व्हावी यासाठी सांगवी येथील पी. डब्ल्यू. डी मैदान येथे 11 ते 15 जानेवारी या कालावधीत पवनाथडी जत्रेचे आयोजन केले आहे. या जत्रेत 822 स्टॉल्स असून, त्यातील 342 स्टॉल्स हे साहित्य विक्रीसाठी, 220 स्टॉल्स शाकाहारी मराठमोळ्या खाद्यपदार्थांसाठी, 250 स्टॉल्स हे मांसाहारी खाद्यपदार्थांसाठी आणि बाकीचे 10 स्टॉल्स हे महापालिकेतर्फे नागरिकांना विविध सुविधा पुरविण्यासाठी राखीव ठेवण्यात आले आहेत. साहित्य खरेदी, खांद्यपदार्थांचा अस्वाद घेण्यासाठी गर्दी करत आहेत.
पवनाथडी जत्रेला 2007 मध्ये सुरुवात झाली असून, आज 16 वर्षे झाली. सध्या पिंपरी-चिंचवड शहरात 13 हजारांहून जास्त सक्रीय बचत गट आहेत. त्यातील अनेक महिलांनी पवनाथडी जत्रेतील स्टॉल्सची संख्या वाढवण्याची मागणी केली होती. त्यामुळे महिलांची गरज ओळखून महापालिकेच्या वतीने यावर्षी 822 स्टॉल्स उपलब्ध करून देण्यात आले आहेत. तर 10 स्टॉल्स हे महानगरपालिकेतर्फे नागरिकांना विविध सुविधा पुरविण्यासाठी राखीव ठेवले आहेत. दररोज 1 लाखांपेक्षा जास्त नागरिक पवनाथडी जत्रेस भेट देत आहेत.
महापालिकेच्या वतीने पवनाथडी जत्रेमध्ये महिलांच्या सक्षमीकरणाच्या अनुषंगाने विविध प्रयोग करण्यात आले. यावर्षी दिव्यांग बचत गट आणि तृतीयपंथी बचत गटांची स्थापना करून नव्याने त्यांना स्टॉल्स उपलब्ध करून देण्यात आले आहेत. स्थानिक कलाकारांना आणि महिलांना जास्तीत जास्त प्रोत्साहन देण्यावर भर देण्यात आला आहे.
– अजय चारठाणकर, उपायुक्त, पिंपरी-चिंचवड महापालिका.