पुणे – पोलीस, वैद्यकीय यंत्रणा, शासकीय अधिकारी, रेल्वे अशा एकनाअनेक यंत्रणा करोनाचा प्रत्यक्षात सामना करण्यासाठी मैदानात उतरल्या आहेत. आता सगळ्यांच्या बरोबरीने रेल्वेच्या कर्मचाऱ्यांचे परिवारदेखील यामध्ये सहभागी झाले आहेत. या परिवारांकडून मास्कची निर्मिती करण्यात येत आहे.
मालगाड्या आणि पार्सल गाड्यांद्वारे जीवनावश्यक वस्तू पोहोचवण्यात येत आहेत. यासाठी देशभरामध्ये हजारो कर्मचारी तैनात असून, त्यांच्या सुरक्षितेच्या दृष्टीने त्यांना मास्क, सेनिटायझर आदी गोष्टी देण्यात येत आहेत. पुणे विभागाचे मंडल वाणिज्य प्रबंधक सुरेशचंद्र जैन आणि त्यांच्या पत्नी कुंजन जैन यांनीदेखील 300 मास्कची निर्मिती केली आहे. याशिवाय, पुणे विभागातील रेल्वे सुरक्षा दल, विद्युत, ऑपरेटिंग, वाणिज्य या विभागांतील कर्मचारी आणि त्यांच्या परिवारातील सदस्यांनी मागील काही दिवसांमध्ये सुमारे 12 हजारांहून अधिक मास्क तयार केले आहेत. यासाठी परिवारांना रेल्वे बोगीमध्ये वापरले जाणारे नवीन लिनन देण्यात येत आहे. येत्या काळात मास्कचे निर्जंतुकीकरण करून रेल्वे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना देण्यात येणार आहेत.
आरपीएफकडून फेस शिल्ड
मध्य रेल्वेच्या पुणे विभागातील रेल्वे सुरक्षा दलाकडून फेस शिल्ड आणि मास्कची निर्मिती करण्यात येत आहे. रेल्वे बोर्ड आणि जागतिक आरोग्य संघटनेच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार याची निर्मिती होत आहे. आरपीएफचे मंडल सुरक्षा आयुक्त अरुण त्रिपाठी यांच्या सूचनाप्रमाणे हे काम सुरू आहे. यामध्ये कर्मचाऱ्यांबरोबरच त्यांच्या परिवाराने सुद्धा सहभाग घेतला आहे. पुणे विभागामध्ये एका आठवड्यात किमान 10 हजार मास्कची निर्मिती करण्यात येणार आहे. तर पहिल्या टप्प्यात कर्मचाऱ्यांकडून 500 फेस शिल्डची निर्मिती करत असून, येत्या काळात मध्य रेल्वेतील सर्व कर्मचाऱ्यांसाठी याची निर्मिती करण्यात येणार आहे.