शरद पवारांच्या राजकारणाचा अस्त; गोपीचंद पडळकरांची जहरी टीका

कोल्हापूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि राजकीय रणनितीकार प्रशांत किशोर यांच्यात आज दिल्लीत दुसरी बैठक पवार यांच्या निवासस्थानी पार पडली. त्यांच्या या भेटीमुळे राष्ट्रीय स्तरापासून ते राज्यातील राजकारणात चर्चांना उधाण आले आहे. या भेटीवरून भाजपकडून टीका करण्यात येत आहे.

भाजपचे विधान परिषद आमदार गोपीचंद पडळकर यांनी शरद पवारांवर हल्लाबोल केला आहे. प्रशांत किशोर यांच्या सारख्या भाडोत्री चाणक्याला भेटावं लागतंय याचा अर्थ शरद पवार यांच्या राजकारणाचा अस्त होतोय, अशी घणाघाती टीका गोपीचंद पडळकर यांनी केली. ते कोल्हापुरात बोलत होते.

यावेळी पडळकर यांनी अजित पवार यांच्यावरही टीका केली. राज्यातील सरकार काका-पुतण्याचं भ्रष्टाचारी सरकार असल्याचं पडळकर यांनी म्हटलं. मागासवर्गीय उपसमितीचे अध्यक्ष अजित पवार कसे होऊ शकतात ? मनमानी कारभार सुरू असल्याचा आरोप पडळकर यांनी केली.

यावेळी त्यांनी मराठा आरक्षणावरूनही टीका केली. ते म्हणाले की, मराठा समाजाच्या ताटात माती टाकण्याचं काम या सरकारने केलं.  बहुजनांवर अन्याय करण्याचं या सरकारचं षडयंत्र आहे. काँग्रेसचं देखील काका-पुतण्यासमोर काही चालत नसल्याची टीका पडळकर यांनी केली.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.