नवी दिल्ली – संपूर्ण जगाला करोना संसर्गाच्या खाईत ढकलून चीनलाही करोना संसर्गाच्या झळा सहन कराव्या लागत आहे. करोना संसर्गामुळे जागतिक पातळीवर चीनची विचित्र खानपान पद्धती चर्चेत आली होती. वटवाघूळ खाल्ल्यामुळेच करोना आल्याचा दावा करण्यात येत होता. त्यामुळे चीनवर टीका करण्यात येत होती. या टीकेनंतरही चीनने आपल्या खानपान पद्धतीत सुधारणा केली नसल्याचं चित्र आहे.
चीनच्या यूलिन प्रांतात १० दिवस चालणाऱ्या ‘डॉग मीटर फेस्टीव्हल’ला सुरूवात झाली आहे. या दहा दिवसांत ५ हजारहून अधिक कुत्र्यांचा बळी जाणार असल्याचं समजतं. ‘द सन’च्या रिपोर्टनुसार पशू क्रुरता आणि आरोग्य संबंधी धोक्यांकडे दुर्लक्ष करून युलीनमध्ये हा फेस्टीव्हल करण्यात येत आहे.
या फेस्टीव्हलमध्ये दुसऱ्या प्रांतातून कुत्रे आणण्यात येत आहेत. तसेच फेस्टीव्हलच्या नावावर हजारो कुत्र्यांना ठार करण्यात येत आहे. फेस्टीव्हलच्या आधीपासूनच मांस विक्रेत्यांनी कुत्र्यांना कापून बकऱ्यांप्रमाणे आपल्या दुकानांमध्ये लटकवलं आहे.
दरम्यान ह्युमन सोसायटी इंटरनॅशनलच्या चाईना पॉलिसी एक्सपर्ट डॉ. पीटर ली यांनी म्हटलं की, करोना काळात अशा फेस्टीव्हलला मंजुरी देणे धोकादायक ठरू शकतं. या फेस्टीव्हलमध्ये मोठ्या प्रमाणात लोक एकत्र येतील कुत्र्याचं मांस खातील, त्यामुळे करोना संसर्ग वाढू शकतो, असंही त्यांनी नमूद केलं.