मंचर- आंबेगाव विधानसभा मतदार संघातील राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि मित्र पक्षाचे उमेदवार दिलीप वळसे पाटील हे विजयी झाल्याचे घोषित केल्यानंतर कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. यावेळी कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करीत फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली.
अवसरी खुर्द येथील मतमोजणी केंद्राबाहेर कार्यकर्त्यांचा उत्साह आणि त्यांचा जल्लोष पाहण्यासारखा होता. अगदी पहिल्या फेरीपासूनच आघाडीवर असणारे उमेदवार दिलीप वळसे पाटील यांच्या मताधिक्याचा जसजसा आकडा वाढेल तसतसा कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारत होता. आंबेगाव मतदार संघावर सलग सातव्यांदा दिलीप वळसे पाटील यांनी 66 हजार 775 मतांचे विक्रमी मताधिक्य घेऊन विरोधी पक्षाच्या उमेदवारांचा पराभव केला.