पालखी मार्गावर सर्व प्रकारच्या वाहनाना बंदी
जेजुरी- महाराष्ट्रचे कुलदैवत असणाऱ्या जेजुरीच्या खंडोबा देवाची सोमवती यात्रा सोमवारी (दि. 28) दिवाळी पाडवा दिवशी साजरी होत आहे. पहाटे 3 वाजता जेजुरी गडावरुन खंडोबा देवाचा पालखी सोहळा प्रस्थान ठेवणार असून, सकाळी 7 वाजता कऱ्हा नदीवर उत्सव मूर्तींना विधिवत स्नानाचा विधी होणार आहे.
सोमवती यात्रेच्या तयारीसाठी बुधवारी (दि. 23) ग्रामस्थ मंडळाची बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यामध्ये हा निर्णय घेण्यात आला. जेजुरीचा खंडोबा महाराष्ट्रचे कुलदैवत असून वर्षाकाठी देवाच्या आठ यात्रा जेजुरीत भरतात. यातील सोमवती यात्रेला मोठे धार्मिक महत्व आहे. सोमवारी अमावस्या आल्यास ही यात्रा भरते. यावेळी खंडोबा व म्हाळसादेवीच्या उत्सव मूर्तींना पालखीतून कऱ्हा नदीवर नेऊन पापनाश तीर्थावर विधिवत स्नान घालून महाआरती केली जाते.
सोमवारी पहाटे 3 वाजता जेजुरी गडावरुन पालखी सोहळा सुरू होऊन सकाळी 7 वाजता कऱ्हास्नान होणार आहे. दुपारी बारा वाजेपर्यंत हा सोहळा गडावर पोहोचेल, असे देवाचे मानकरी राजेंद्र पेशवे यांनी सांगितले. या सोहळ्यासाठी आवश्यक त्या सुविधा देवसंस्थानच्या वतीने उपलब्ध करुन देण्यात येतील, असे प्रमुख विश्वस्त ऍड. अशोक संकपाळ यांनी सांगितले. गेल्या आठ दिवसांत मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळे कऱ्हानदी मार्गावर मोठे खड्डे पडले असून, चिखल ही मोठ्या प्रमाणात झाला आहे. त्यामुळे कोणतीही वाहने सोडली जाणार नाहीत.
जेजुरीतून पालखी मार्गावर वाहने न आणता ती आठवडे बाजार परिसरात लावावीत. तसेच कोथळेकडून येणारी वाहने तेथील शाळेजवळ लाववीत, असे आवाहन जेजुरी पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक अंकुश माने यांनी केले आहे. या बैठकीसाठी सोहळा समितीचे अध्यक्ष गणेश आगलावे, पदाधिकारी राजेंद्र पेशवे, रमेश राऊत, अरुण खोमने, सुशील राऊत, पंडित हरपळे, राजाभाऊ खाडे, रामदास राऊत, काशीनाथ मोरे, जलिंदर खोमने, देवसंस्थानचे विश्वस्त अशोक संकपाळ, शिवराज झगडे, संदीप जगताप, राजकुमार लोढा, व्यवस्थापक राजेंद्र जगताप, माजी विश्वस्त सुधीर गोडसे, नितीन राऊत, जेजुरी पोलीस स्टेशनचे अधिकारी अंकुश माने, रविंद्र खोमणे, रोहिदास माळवदकर, अविनाश झगडे, अशोक सकट, माणिक पवार, कृष्णा कुदळे, दिलावर खान, दिलावर मनेर व ग्रामस्थ उपस्थित होते.