पुणे : कोरोनामुळे दोन वर्षांपासून बंद असलेली जनरल (अनारक्षित) तिकीट सुविधा बुधवार (दि.29) पासून सुरू होणार आहे. सर्व मेल, एक्स्प्रेस, सुपरफास्ट ट्रेन्ससाठी जनरल तिकीट मिळणार आहे. त्यामुळे सर्वसामान्य प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता रेल्वे प्रशासनाने मार्च 2020 मध्ये जनरल तिकीट सेवा बंद केली होती. त्यामुळे केवळ आरक्षित तिकीट असणाऱ्या प्रवाशांनाच प्रवास करता येत होता. पण, आता जनरल तिकीट सुरू करण्याची वारंवार मागणी केली जात होती.
दरम्यान, ऍडव्हान्स रिझर्व्हेशन पीरिएड (एआरपी) 120 दिवसांचा असल्याने जनरल तिकीट सुविधा सुरू केली जात नव्हती. आता हा एआरपी कालावधी 28 जून रोजी संपणार आहे. त्यामुळे प्रवाशांना आता तिकीट काउंटर, एटीव्हीएम (ऑटोमॅटिक तिकीट व्हेडिंग मशिन) आणि यूटीएस मोबाइल ऍपद्वारे जनरल तिकीट काढता येणार आहे. पहिल्या टप्प्यात लोकल, डेमू आणि पुणे-मुंबईदरम्यान धावणाऱ्या इंटरसिटी ट्रेन्ससाठी जनरल तिकीट सेवा सुरू करण्यात आली होती. इतर ट्रेन्ससाठी हे सुविधा आता सुरू होत आहे.
‘प्रवाशांसाठी जनरल तिकीट सेवा सुरू होणार असल्याने प्रशासनाची पूर्ण तयारी झाली आहे. प्रवाशांची संख्या लक्षात घेऊन काऊंटरची संख्या वाढवली जाईल. प्रवाशांनी जास्तीत जास्त मोबाइल ऍपद्वारे तिकीट घेण्यासाठी मोहीम सुरू केली आहे.’
-मनोज झंवर, जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे, पुणे
पुणे रेल्वे स्थानक तिकीट सुविधा
बुकिंग काउंटर – 8
एटीव्हीएम मशिन -25