रसिकांच्या मनावर गाण्यांची मोहर
पुणे – “हृदयाच्या तालावरी नाचे गणेशु’, “गणराज रंगी’, अशा एकापेक्षा सरस गीतांनी सोमवारी संगीतप्रेमींची सायंकाळ बहरली. राज्याच्या विविध कोपऱ्यांतून आलेल्या युवा कलाकारांनी आपली कला सादर करत, रसिकांवर पुन्हा एकदा आपल्या गाण्यांची मोहर उमटविली. निमित्त होते पहिल्या ऑनलाइन सांस्कृतिक महोत्सवाचे.
श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टच्या वतीने आयोजित “ऑनलाइन सांस्कृतिक महोत्सवात’ गायनसेवा अर्पण करण्यात आली. एका वाहिनीवरील गाण्याच्या कार्यक्रमातून संगीतप्रेमींच्या घराघरात पोहोचलेले “लिटील चॅम्प्स’ फेम युवा गायक प्रथमेश लघाटे, मुग्धा वैशंपायन, कार्तिकी गायकवाड आणि विराज जोशी यांनी सुश्राव्य गीते सादर केली.
प्रथमेश लघाटे यांनी “हृदयाच्या तालावरी नाचे गणेशु’, “मदनाचा पुतळा राजस सुकुमार’, “काटा रुते कुणाला’ या लोकप्रिय गीतांसह विविध गीते सादर केली. मुग्धा वैशंपायन यांनी “गणराज रंगी’, “श्रीरंगा…कमलाकांता’ आदी गीते, तर कार्तिकी गायकवाड यांनी “ओंकार अनादी अनंत’, “विष्णूमय जग’, “हे सुरांनो चंद्र व्हा’ आदी गीते सादर केली. यासह विराज जोशी यांनी “इंद्रायणी काठी’, “ज्याचा सखा हरी’ आदी गीते सादर केली. युवा गायकांच्या कलाविष्कारामुळे हा “ऑनलाइन’ कार्यक्रम रसिकांसाठी पर्वणी ठरला. मिलिंद कुलकर्णी यांनी या कार्यक्रमाचे निवेदन केले. वाद्यांच्या साथीमुळे कार्यक्रम अधिकच बहारदार झाला.
आज रंगणार वादनाची जुगलबंदी…
मंगळवारी (दि. 25) ऑनलाइन महोत्सवांतर्गत आंतरराष्ट्रीय कीर्तीचे तबलावादक पद्मश्री पं. विजय घाटे आणि बासरीच्या मंजुळ स्वरांनी रसिकांना मोहित करणारे प्रसिद्ध बासरीवादक राकेश चौरसिया यांची जुगलबंदी रसिकांना अनुभवता येणार आहे. मंडळाच्या www.bhaurangari.com या संकेतस्थळावर सायंकाळी 7.00 वाजता आणि दुपारी 3.30 एबीपी माझावर हा कार्यक्रम पाहता येणार आहे.