पुणे – महापालिकेच्या अतिक्रमण नियंत्रण विभागाचे मनुष्यबळ गणेशोत्सव मंडप परवानगीत अडकल्याने अतिक्रमण निर्मूलन कारवाईला ब्रेक लागला आहे. त्यामुळे अनधिकृत पथारीवाल्यांचे फावले असून, त्यांनी राजरोसपणे रस्त्यावर व्यवसाय मांडल्याचे चित्र पहायला मिळत आहे.
महापालिकेकडून गणेश मंडळांना ऑनलाइन स्वरूपात मंडप परवानगी देण्यात येत आहेत. मात्र, त्यात समस्यांच्या निराकरणासाठी सर्व क्षेत्रीय कार्यालयांत एक खिडकी योजना सुरू केली आहे. याठिकाणी अतिक्रमण निरीक्षकांची नियुक्ती असल्याने त्यांना शहरात कारवाई करण्याला वेळच मिळत नाही, अशी स्थिती आहे.
परवानगी दिलेल्या आणि परवाना, फेरीवाला प्रमाणपत्रातील अटी-शर्थींचा भंग करणाऱ्या शहरातील 5 हजार नोंदणीकृत फेरीवाल्यांना प्रशासनाने नोटीस बजावल्या आहेत. वारंवार नोटीस बजावूनही थकबाकी जमा न करणाऱ्या फेरीवाल्यांचे स्टॉल जप्त करण्याची मोहीम महिनाभरापासून सुरू करण्यात आली होती.