पुणे – जागतिक पातळीवर सोन्याचे उत्पादन आहे त्या पातळीवर कायम राहण्याची शक्यता असतानाच विविध आर्थिक घडामोडींमुळे मागणी मात्र वाढणार आहे. यामुळे जागतिक बाजारात लघु ते मध्यम पल्ल्यात सोन्याचे भाव वाढते राहण्याची शक्यता आहे. भारत सोन्याचे उत्पादन करत नसल्याने जागतिक बाजारपेठेतील दरवाढीच्या प्रमाणात भारतातील सोन्याचे दर वाढतील. काही विश्लेषकांना वाटते की, “डिसेंबरपर्यत सोन्याचे भाव 40 हजार रुपये प्रति तोळा या पातळीवर जातील.’
सध्याच्या दरवाढीची कारणमीमांसा करताना व्यापारी आणि विश्लेषकांनी सांगितले, “जागतिक पातळीवर यासाठी अनेक घटक कारणीभूत आहेत. अमेरिकेने भारत, चीन आणि युरोपीय समुदायासह अनेक देशाबरोबर व्यापार युद्ध सुरू केले आहे. यामुळे जागतिक व्यापार कमी होत आहे. भारत व चीनसारख्या मोठ्या देशांचा विकास दर कमी होत आहे. यामुळे उद्योग, व्यापार आणि शेअर बाजारातील पैसा सोन्याकडे वळत आहे. यामुळे चलन बाजार अस्थिरता असल्याने गुंतवणूकदार सोन्यातील सुरक्षित गुंतवणुकीकडे वळत आहेत.