पुणे- महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेतील (विद्या प्राधिकरण) व्हर्चुअल क्लासरुम स्टुडिओच्या माध्यमातून राज्यातील दुर्गम भागातील शाळांमधील विद्युत पुरवठा वारंवार खंडित होत असल्याने विद्यार्थ्यांशी थेट संपर्क साधण्यात अडचणी येऊ लागल्या आहेत. या अडचणी सोडविण्यासाठी शाळांना सूचनाही देण्यात आलेल्या आहेत.
समग्र शिक्षा, एमएससीआयटी, व्हॅल्युएबल ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने विद्या प्राधिकरणात ऑगस्टमध्ये व्हर्चुअल क्लासरुम स्टुडिओ उभारण्यात आला होता. नंदूरबार, गडचिरोली, नाशिक, पालघर या चार आदिवासी जिल्ह्यातील शैक्षणिकदृष्ट्या मागास विभागातील प्रत्येकी 9 याप्रमाणे एकूण 36 निवडक शाळांमधील इयत्ता नववी व दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी विज्ञान, गणित, इंग्रजी या विषयांच्या संकल्पना स्पष्ट करून सांगण्यासाठी तज्ज्ञ शिक्षकांचे मार्गदर्शन एकाच वेळी व्हावे असे नियोजन करत त्याची अंमलबजावणी करण्यात आलेली आहे. व्ही-सॅटवर आधारित स्टुडिओ उभारण्यात आलेला आहे.