सातारा – जिल्ह्यातील मुदत संपलेल्या 44 सहकारी संस्थांच्या निवडणुका ऐन दिवाळीनंतर जाहीर करण्याची तयारी सहकार निवडणूक प्राधिकरणाने चालविली आहे. राज्य शासनाने सहकारी संस्थाच्या निवडणुकांना दिलेली स्थगिती उठवली असून आता मुदत संपलेल्या सर्व सहकारी संस्थांच्या निवडणुक कार्यक्रमांना गती मिळणार असल्याचे संकेत आहेत.
ज्या टप्प्यावर निवडणुका थांबल्या होत्या. तेथून पुढे प्रक्रिया सुरु होणार आहे. जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षक सहकारी बॅंक, सैनिक सहकारी बॅंक, रयत सेवक बॅंक, तालुका खरेदी विक्री संघासह बाजार समितींच्या निवडणुकांची प्रक्रिया सुरु होत आहे.
राज्य सरकारने सहकारी संस्थांच्या निवडणुकांना 30 सप्टेंबरपर्यंत स्थगिती दिली होती. त्यामुळे ऐन निवडणूक प्रक्रिया सुरु असलेल्या संस्थांची निवडणूक आहे त्या टप्प्यावर थांबवावी लागली होती. जिल्ह्यातील 44 सहकारी संस्थांची निवडणूक थांबली होती. आता राज्य सरकारने दिलेली स्थागितीची मुदत संपल्याने राज्य सहकार निवडणूक प्राधिकरणाचे सचिव पी. एल. खंडागळे यांनी परिपत्रक काढून सहकारी संस्थांच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरु होत असल्याचे सर्व जिल्हा उपनिबंधकांना पत्र पाठवून कळविले आहे. त्यानुसार जिल्ह्यातील 44 सहकारी संस्थांची निवडणूक प्रक्रिया सुरु होणार आहे.
यामध्ये सर्वाचे लक्ष लागलेल्या प्राथमिक शिक्षक सहकारी बॅंक व रयत सेवक सहकारी बॅंकेंचा बिगुल येत्या आठवड्यातच वाजणार आहे. या दोन्ही बॅंकांची प्रक्रिया अर्ज दाखल करण्यापासून सुरु होणार आहे. तसेच इतर सहकारी संस्थांचीही निवडणूक प्रक्रियाही सुरु होणार आहे. त्यासाठीचा निवडणूक कार्यक्रम सहकार निवडणूक प्राधिकरण लवकरच जाहीर करणार आहे. त्यामुळे आता सर्वांचे लक्ष प्राधिकरणाच्या निर्णयाकडे लागले आहे.
ऐन दिवाळीतच धुरळा उडण्याची शक्यता
तालुका खरेदी विक्री संघ व बाजार समितींच्या निवडणुकाही यासोबतच होणार आहेत. बाजार समितीची यादी पूर्ण झाली आहे. आता थेट निवडणूक कार्यक्रमच जाहीर होणार आहे. त्यामुळे ऐन दिवाळीत सहकाराच्या निवडणुकांचा धुरळा उडणार आहे.