पुणे – थंडीसाठी अडसर ठरणारे अरबी समुद्रातील कमी दाबाचे क्षेत्र आता पूर्णपणे निष्क्रिय झाले असून, आगामी काळात राज्यातील वातावरण कोरडे राहणार आहे. त्यामुळे पुण्यासह राज्यात थंडीचा प्रभाव पुन्हा वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
अरबी समुद्रात कर्नाटक ते गुजरातच्या किनारपट्टीदरम्यान सक्रिय झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे गेले आठवडाभर राज्यातील थंडी पूर्णपणे नाहीशी झाली होती. पुण्यासह राज्यात ढगाळ वातावरण आणि तापमानात सातत्याने चढ-उतार अनुभवायला मिळाला. त्याचबरोबर सहा जानेवारी रोजी पुणे जिल्ह्यात रेकॉर्डब्रेक पावसाने हजेरी लावली. त्यामुळे ऐन हिवाळ्यात पुणेकरांनी पावसाळ्याची अनुभूती घेतली.
मात्र, आता हे कमी दाबाचे क्षेत्र पूर्णपणे निष्क्रिय झाले असून, आगामी काळात राज्यातील वातावरण कोरडे राहणार आहे. त्यामुळे पुण्यासह राज्यभरात थंडीचा प्रभाव पुन्हा वाढण्याची शक्यता आहे.
दरम्यान, हवामान विभागाने घेतलेल्या नोंदीनुसार, पुण्यात सोमवारी (दि.11) दिवसभरात 31.4 अंश सेल्सिअस कमाल, तर 18.1 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली.