नवी दिल्ली : देशातील करोनाला रोखण्यासाठी कोविशील्ड लसीचा वापर केला जात आहे. मात्र युरोपियन मेडीसीन एजन्सीने कोविशील्ड लस ग्रीन पास यादीत ठेवले नाही. हे ताजं असतानाच आता कोविशील्डच्या दोन डोसमधील अंतर १० महिने ठेवल्यास लस अधिक प्रभावी ठरते असा खुलासा करण्यात आला आहे. लस उत्पादन करणाऱ्या ऑक्सफोर्ड कंपनीनेच हा अभ्यास सादर केला आहे.
अभ्यासात एस्ट्राजेनेका लसीच्या दोन डोसमधील अंतर १२ आठवड्यांऐवजी ४५ आठवडे केल्यास अथवा १० महिन्याचं अंतर ठेवल्यास ही लस शरीरात अत्यंत प्रभावी काम करत असल्याचा दावा करण्यात आला आहे. तसेच या लसीच्या बुस्टर डोसनंतर मानवी शरीरात रोगप्रतिकारशक्ती अनेक पटीने वाढू शकतात, असही सांगण्यात आलं आहे. भारतात ऑक्सफोर्ड-एस्ट्राजेनेका ही लस कोविशील्ड या नावाने दिली जाते.
एस्ट्राजेनेका लसीच्या पहिल्या डोसनंतर जवळपास १ वर्ष शरीरात अँन्टीबॉडी तयार होतात. लसीच्या दुसऱ्या डोसनंतर एक वर्षापर्यंत काही प्रमाणात अँटीबॉडी राहतात. दुसऱ्या डोसनंतर अँटीबॉडीची पातळी ४ ते १८ पट वाढलेल्या आढळून आली. तर दुसऱ्या डोसनंतर ६ महिन्यांनी बूस्टर म्हणून तिसरा डोस दिल्यास करोनाच्या नव्या व्हेरिएंटविरोधात शरीरात लसीचा अधिक प्रभावी आणि सकारात्मक परिणाम दिसत असल्याचं म्हटलं आहे.
अभ्यासात १८ ते ५५ वयाच्या स्वयंसेवकांना या अभ्यासात सामील कऱण्यात आलं होतं. भारतात या लसींमधील अंतर १२ ते १६ आठवड्यांचं आहे.