पिंपरी – चालकानेच कंटेनर ट्रकमधील 7 लाख, 61 हजार 162 रुपये किंमतीचे 160 टायर चोरल्याच्या घटनेचा छडा लावण्यात भोसरी पोलिसांना यश आले आहे. चोरीतील सर्व मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. सुरेश प्रकाश राजोळे (वय 25, रा. चिंबळी फाटा, मुळगाव तिरुपटेलवाडी, ता. निलंगा, जि. लातुर) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी कंटेनर ट्रकमालक प्रदीप सोनदत्त शर्मा (वय 34, रा. मोशी) यांनी फिर्याद दिली होती. चाकण एमआयडीसीमधील ब्रिस्टॉन कंपनीतून अंधेरी, मुंबई नेण्यासाठी 14 लाख, 37 हजार 564 रुपये किंमतीचे एकूण 421 टायर लोड केले होते. आरोपी सुरेश याने कंटेनर भोसरी येथे आणून, 421 टायरपैकी 160 टायरची चोरी करण्याच्या उद्देशाने ते काढून भोसरी येथे लपवून ठेवले होते. पोलिसांनी चोरीचा माल जप्त केला असून, भोसरी पोलीस तपास करत आहेत.