लोणीकंद, (वार्ताहर) – लोणीकंद येथे श्री म्हसोबा देवाच्या यात्रा उत्सवा निमित्त दोन दिवस बैलगाडा शर्यत आणि कुस्तीच्या आखाड्याच्या आयोजन करण्यात आले होते. कुस्ती आखाड्यात ४७ निकाली कुस्त्या होत. २१०९ ते ६० हजार रुपयापर्यंत इनाम देण्यात आले. यावेळी म्हसोबा देवाच्या उत्सवानिमित्त आयोजित कुस्तीच्या आखाड्यात शिवम सिदनाळे हा चांदीच्या गदेचा मानकरी ठरला.
यात्रोत्सवानिमित्त भरवण्यात आलेली बैलगाडा शर्यत आणि कुस्तीच्या आखाड्यास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. बैलगाडा शर्यतीत एकूण १७० गाड्यांनी सहभाग घेऊन प्रथम विजेत्यास एक लाख एकवीस हजार, द्वितीय एक लाख एक हजार, तृतीय पंच्याहत्तर हजार या सह सुमारे साडेआठ लाखांची बक्षिसे देण्यात आली.
बैलगाडा शर्यतीतील फायनल मध्ये मलठण येथील शौर्य दादा सागर दंडवते व ब्रिजेश रखमाजी धुमाळ हे दुचाकी मोटरसायकलचे मानकरी ठरले. तर गणेश संभाजी लोखंडे यांचा गाडा घाटाचा राजा किताबाचा मानकरी ठरला असून यावर्षीपासून सलग तीन वर्ष पहिल्या येणाऱ्या गाड्या विक्रमी ११ लाख ११ हजार १२१ रुपयांच्या बक्षिसासह विविध इनामामुळे गाडा बैल मालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. तर दुसऱ्या दिवशी यात्रेनिमित्त निकाली कुस्त्यांच्या आखाड्याला कुस्ती शौकिनांचा प्रतिसाद लाभला. यावेळी सुमारे ४७ निकाली कुस्त्यांना २१०९ रुपयांपासून साठ हजार रुपयांपर्यंत इनाम देण्यात आले.
शिवराम दादा तालमीच्या पैलवान शुभम सिद्धनाळे यांना प्रथम क्रमांकाची चांदीची गदा देण्यात आली. यात्रोत्सवासाठी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष पीडीसीसी बँकेचे संचालक प्रदीप कंद, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती नारायण कंद, रवींद्र कंद, भाजप क्रीडा आघाडीचे अध्यक्ष संदीप भोंडवे, माजी सरपंच अनिल होले, श्रीकांत कंद, सरपंच प्रियंका झुरुंगे, उपसरपंच राहुल बाबासाहेब शिंदे आदींसह गावातील ग्रामस्थांनी परिश्रम घेतले.