नवी दिल्ली – देशातील प्रौढ नागरिकांना देण्यात आलेल्या करोनालसींच्या डोसची संख्या शनिवारी 133 कोटींच्या घरात पोहचली. त्यामुळे चालू वर्षाच्या अखेरपर्यंत देश 150 कोटी डोस संख्येचा टप्पा गाठण्याची शक्यता आहे.
देशातील करोना लसीकरण मोहिमेचा प्रारंभ 16 जानेवारीपासून झाला. त्या मोहिमेंतर्गत 18 वर्षांवरील प्रौढांचे लसीकरण सुरू आहे. ओमायक्रॉन या करोनाच्या नव्या अवताराने संपूर्ण जगाची चिंता वाढवली आहे. त्यामुळे भारतातील प्रौढांचा प्रतिसाद वाढून लसीकरणाला आणखी वेग येण्याची चिन्हे आहेत.
केंद्र सरकारबरोबरच राज्यांकडून लसींचा दुसरा डोस देण्यावर भर दिला जात आहे. सध्या लसींचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. त्यामुळे लसीकरणासाठी पुढे येण्याचे आवाहन सरकारी यंत्रणांकडून प्रौढांना केले जात आहे.
बालकांच्या लसीकरणाला आणि बूस्टर डोसला केव्हा परवानगी मिळणार याची उत्सुकताही आता बळावली आहे. देशात आतापर्यंत 81 कोटींहून अधिक प्रौढांना पहिला डोस देण्यात आला आहे. तर, दोन्ही डोस मिळाल्याने 51 कोटी प्रौढांचे लसीकरण पूर्ण झाले आहे.