सातारा – जिल्ह्यात एकाच दिवसात 20 जणांचे करोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यामुळे जिल्हा हादरून गेला. या 20 जणांध्ये कराड तालुक्यातील 14 व सातारा शहरातील महिलेसह कारागृहातील पाच कैद्यांचा समावेश आहे. करोनाच्या आजच्या या तडाख्याने जिल्ह्यातील रुग्णसंख्येने शतक ओलांडले. जिल्ह्यातील रुग्णसंख्या 112 वर पोहचली आहे. जिल्ह्यात विविध ठिकाणी दाखल असलेल्या संशयितांपैकी 171 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. तर विविध विलगीकरण कक्षात 314 जणांना दाखल करण्यात आले आहे.
जिल्हा कारागृहातील पाच जण पॉझिटिव्ह आल्याने कारागृहातील करोनाग्रस्तांची संख्या आता 9 झाली आहे. तर प्रतापगंज पेठेतील करोनाबाधिताच्या निकट सहवासातील 70 वर्षे वयाची महिला पॉझिटिव्ह आल्याने शहरातील चिंतेत भर पडली आहे. करोनाचा हॉटस्पॉट झालेल्या कराड तालुक्याती करोनाबाधितांची संख्या आता 84 वर पोहचली आहे.
कराड येथील करोनाबाधित रुग्णाच्या निकट सहवासातील 12 जण व सातारा येथील जिल्हा कारागृहातील 5 कैदी अशा एकूण 17 जणांचा अहवाल करोना पॉझिटिव्ह (कोविड-19) आला आहे, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली आहे.
त्यापूर्वी आज सकाळी कराडच्या वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयात दाखल असणारी 2 वर्षीय मुलगी व 68 वर्षीय पुरुष तर सातारच्या क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा सर्वसाधारण रुग्णालयात दाखल असणारी 70 वर्षीय महिला अशा 3 जणांचा अहवाल करोना पॉझिटिव्ह (कोविड-19) आला. हे तिन्ही रुग्ण करोनाबाधित रुग्णाच्या निकट सहवासातील आहेत. त्यामुळे आज दिवसभरात 20 रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने जिल्ह्यातील करोनाबाधितांची संख्या आता 112 झाली आहे. त्यामध्ये सध्या जिल्ह्यात 96 करोनाबाधितांवर उपचार सुरू आहेत. 14 रुग्ण करोनामुक्त होऊन घरी गेले आहेत. तर दोन करोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे.
सातारच्या क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा सर्वसाधारण रुग्णालयातील 24, कराडच्या कृष्णा मेडिकल कॉलेजमदील 30 व वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयातील 44, कोरेगावच्या ग्रामीण रुग्णालयातील 43, फलटणच्या उपजिल्हा रुग्णालयातील 25 व वाईच्या ग्रामीण रुग्णालयातील 5 असे एकूण 171 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले असल्याचेही डॉ. गडीकर यांनी सांगितले. सातारच्या क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा सर्वसाधारण रुग्णालयात 17, कराडच्या कृष्णा मेडिकल कॉलेजमध्ये 106 व वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयात 152, वाईच्या ग्रामीण रुग्णालयात 10, फलटणच्या उपजिल्हा रुग्णालयात 29 अशा एकूण 314 जणांना विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे. या सर्वांच्या घशातील स्त्रावांचे नमुने पुण्याच्या बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयाकडे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत, अशी माहितीही जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.