दारुड्यांच्या शिस्तीसाठी मास्तरांची “छडी’

वाईन शॉपबाहेर नऊ प्राध्यापकांची नियुक्‍ती : शिक्षण क्षेत्रात संतापाची लाट


अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर येथील प्रकार

पुणे – संचारबंदीच्या तिसऱ्या टप्प्यात दारू दुकानांबाहेरील गर्दीला शिस्त लावण्यासाठी चक्‍क 9 प्राध्यापकांची नियुक्‍ती करण्यात आल्याचा प्रकार अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर येथे गुरुवारी समोर आला आहे. येथील संत गाडगेबाबा महाविद्यालयाच्या 9 प्राध्यापकांची दारू दुकानांवर समन्वयक अधिकारी म्हणून नियुक्‍ती केल्याने शिक्षण क्षेत्रातून संतापाची लाट निर्माण झाली आहे. या नियुक्‍तीवरून विरोध होऊ लागल्यानंतर तेथील जिल्हा प्रशासनाने तातडीने प्राध्यापकांची नियुक्‍ती रद्द केली.

आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम येथे दारू दुकानांबाहेर सोशल डिस्टन्सिंगच्या नियमाचे पालन करण्याची जबाबदारी म्हणून पोलिसांबरोबर शिक्षकांची नेमणूक केली होती. ही घटना ताजी असताना आता चक्‍क महाराष्ट्रात प्राध्यापकांना दारू दुकानांसमोर गर्दीला शिस्त लावण्यासाठी नियुक्‍त करण्यात आल्याने शिक्षक वर्गातून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे. मनुष्यबळाअभावी ज्ञानदानाचे पवित्र काम करणाऱ्या शिक्षक व प्राध्यापकांना दारू दुकानांवर नेमणूक करणे योग्य नसल्याचे सांगत, या निर्णावरून जोरदार टीका होत आहे.

गेल्या दोन दिवसांपासून राज्य शासनाने राज्यात दारूची दुकाने अटी व शर्थीसह उघडण्यास मुभा दिली. तब्बल महिनाभरानंतर दारूची दुकाने सुरू झाल्याने मद्यपींची प्रचंड गर्दी होत आहे. त्यामुळे करोना प्रतिबंधक उपाययोजनेचा बोजवारा होण्याची शक्‍यता आहे. त्या पार्श्‍वभूमीवर गर्दी नियंत्रित ठेवण्याची जबाबदारी प्राध्यापकांवर सोपवली होती. दरम्यान, यावरून सर्वत्र टीका झाल्यानंतर संबंधित जिल्हाधिकाऱ्यांनी सुधारित आदेश काढून दारू दुकानांवर प्राध्यापकांची नियुक्‍ती करू नये, असे निर्देश दिले आहेत.

दारू दुकानांच्या ठिकाणी प्राध्यापकांची नेमणूक करणे हा विचारच आश्‍चर्यकारक आहे. मात्र, चक्‍क प्राध्यापकांना त्या ठिकाणी ड्युटी लावणे, यावरून नैतिकेची पातळी किती खाली गेले, ही बाब स्पष्ट होते. हा प्रकार निषेधार्ह असून, चुकीचा आहे.
– डॉ. ए. पी. कुलकर्णी, प्रदेश कार्यकारिणी सदस्य, शिक्षक महासंघ


संचारबंदीच्या काळात प्रशासनास मदत म्हणून प्राध्यापकांना पदाप्रमाणे काम देणे योग्य आहे. मात्र, चक्‍क दारूच्या दुकानांवर प्राध्यापकांची नियुक्‍ती करणे, हे मोठे दुर्दैव म्हणावे लागेल. प्रशासनाने ही नियुक्‍ती रद्द केली असली तरी यापुढे प्राध्यापकांना काम देताना योग्य विचार व्हावा, हीच अपेक्षा.
– डॉ. शामकांत लवांडे, “एम.पुक्‍टो’चे जनरल सेक्रेटरी

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.