मुंबई – शिवसेनेच्या दोन्ही गटांच्या आमदार अपात्रतेसंदर्भात नोटीसला उत्तर देण्याची मुदत आज संपली आहे. शिवसेनेच्या शिंदे गटाच्या 40 आमदारांकडून विधिमंडळाच्या नोटीसला उत्तर देण्यात आले आहे. पण ठाकरे गटाच्या आमदारांकडून नोटीसला केराची टोपली दाखवण्यात आली आहे, अशी माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या एकाही आमदाराने नोटीसला उत्तर दिले नाही. उत्तर न दिलेल्या आमदारांना आता सुनावणीसाठी बोलावण्यात येणार आहे. पावसाळी अधिवेशन संपल्यानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे ठाकरे गटाच्या आमदारांना सुनावणीसाठी बोलाविण्याची शक्यता आहे.
दरम्यान, शिवसेना कुणाची हा वाद पहिले सर्वोच्च न्यायालयात आणि मग निवडणूक आयोगात गेला. यानंतर निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे यांना शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण हे चिन्ह दिले.
दुसरीकडे सर्वोच्च न्यायालयाने एकनाथ शिंदेंच्या पक्षाने भरत गोगावले यांची प्रतोद म्हणून केलेली नियुक्ती बेकायदेशीर ठरवली होती. तसेच प्रतोद नेमताना पक्ष कुणाचा आहे हे पाहून निर्णय घ्यावा, असे आदेश विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी देत उत्तर मागितले आहे.