नवी दिल्ली – व्हेनिस चित्रपट महोत्सवात दाखल झालेल्या ‘द डिसायपल’ या मराठी चित्रपटाचे दिग्दर्शक चैतन्य ताम्हाणे यांना या महोत्सवात सर्वोत्कृष्ट पटकथेचा पुरस्कार मिळाला आहे. युरोपियन सिनेमाच्या मुख्य स्पर्धेत पुरस्कार मिळवणारे चैतन्य ताम्हाणे हे पहिले भारतीय दिग्दर्शक ठरले आहेत. या चित्रपटाला आंतरराष्ट्रीय समिक्षक पुरस्कार मिळालेला आहे.
‘द डिसायपल’ हा चित्रपट शास्त्रीय संगीत गायकाच्या जीवनाशी निगडीत असून गेल्या आठवड्यात हा चित्रपट व्हेनिस महोत्सवात दाखवण्यात आल्यानंतर तिथल्या समिक्षकांनी आणि तज्ञांनी गौरवला होता.
भारतीय शास्त्रीय संगीताचे विश्व माझ्यासाठी खुले करणाऱ्या सर्व संगीतकार, संशोधक, लेखक आणि इतिहास संशोधकांना आपण हा पुरस्कार समर्पित करत असल्याची प्रतिक्रिया ताम्हाणे यांनी व्यक्त केली आहे.
शनिवारी झालेल्या सोहळ्यादरम्यान मुख्य स्पर्धेतील विजेत्यांची घोषणा महोत्सवाच्या ज्यूरीने केली. दोनवेळा ऑस्कर पुरस्कार जिंकलेल्या केट ब्लांचेट यांच्या अध्यक्षतेखालील ज्युरी सदस्यांमध्ये दिग्दर्शक जोआना होग्ग, ख्रिस्चियन पेट्झोल्ड आणि वेरोनिका फ्रान्झ, कादंबरीकार निकोल लागिओया आणि कलाकार ल्युडवाईन साग्निएर आणि मॅट डिल्लन यांचाही समावेश आहे.