पक्ष बदलाचा निर्णय उरावर दगड ठेवून

आ. पिचड ः पवार कुटुंबीयांचे चाळीस वर्षे सहकार्य, आज कार्यकर्त्यांचा मेळावा

राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी दिले राजीनामे

या दरम्यान बैठक सुरू होण्यापूर्वी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुकाध्यक्षपदाचा गिरजाजी जाधव, सचिवपदाचा यशवंतराव आभाळे व अन्य पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदांचे राजीनामे पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांना पाठवून दिल्याचे सांगितले. उद्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात अंतिम पक्षप्रवेशाचा निर्णय जाहीर केला जाईल, असे सांगताना पक्षप्रमुख म्हणून आमदार पिचड जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य राहील, असे त्यांनी जाहीर केले.

अकोले – पक्ष बदलाचा कटू निर्णय आपण उरावर दगड ठेवून घेत आहोत. त्यासाठी उद्या सकाळी 11 वाजता पंकज लॉन्स (औरंगपूर फाटा) येथे तालुक्‍यातील सर्व कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित केला गेला आहे. त्यात जो निर्णय होईल, त्याला आपण बांधील राहू, अशी स्पष्ट ग्वाही आ. वैभवराव पिचड यांनी आज दुपारी कार्यकत्यांना दिली.

तालुका दूध संघाच्या सभागृहामध्ये निवडक कार्यकर्त्यांची त्यांनी आज बैठक घेतली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी त्यांनी आपल्या विविध मुद्यांना स्पर्श करीत व मनातील सल व्यक्त करीत आलेल्या अडचणींचा पाढा वाचीत आपण कटू निर्णय घेत असल्याची ग्वाही दिली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष सीताराम गायकर होते. ज्येष्ठ नेते मीनानाथ पांडे, मधुकरराव नवले, के. डी. धुमाळ, जिल्हा परिषद अर्थ व बांधकाम समितीचे सभापती कैलासराव वाकचौरे, आशा पापळ, रावसाहेब वाकचौरे, संगीता शेटे, कचरू पाटील शेटे, जे. डी. आंबरे, यशवंतराव आभाळे व शिखर संस्थांचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

आ. पिचड म्हणाले, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते शरद पवार, अजित पवार यांनी तालुका बांधणीसाठी माजी मंत्री व आपले वडील मधुकरराव पिचड यांना चाळीस वर्षे जे सहकार्य केले, ते नजरेआड करता येणार नाही. मात्र गेल्या पाच वर्षांत तालुक्‍याचा विकास खुंटला होता. सामान्य माणसाच्या हिताचे प्रश्‍न सोडविताना निधी मात्र मिळू शकला नाही. त्यामुळे उद्‌ध्वस्त होणारा तालुका आपण पाहू शकत नाही. केवळ आणि केवळ या हेतूमुळेच आपण हा कटू निर्णय घेत आहे, असे त्यांनी सांगितले. गेल्या पाच वर्षांत अनेक आंदोलने केली. पण विरोधी पक्षाचा आमदार म्हणून आपल्याला निधी मिळू शकला नाही, अशी सल त्यांनी व्यक्त केली.

गायकर म्हणाले, पक्ष बदल हा धाडसी निर्णय आहे. माजी मंत्री मधुकरराव पिचड यांनी सर्वांगीण असा तालुक्‍याचा विकास केला. पण तरुण पिढीला आता नवीन स्वप्ने पडणे स्वभाविक आहे. ते प्रश्न सोडवण्यासाठी केंद्र व राज्य सरकारे ज्या पक्षाकडे आहेत, त्या पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय हा निश्‍चित झालेला आहे, अशी ग्वाही त्यांनी दिली. यावेळी अशा पापळ, कविराज भांगरे, युवा नेते नीलेश गायकर, कासम मनियार, विक्रम नवले, कैलासराव जाधव, गिरजाजी जाधव, ज्येष्ठ नेते विठ्ठलराव चासकर, अशोकराव देशमुख आदींनी मनोगत व्यक्त केले.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)