तपोवन/ डेहराडून – उत्तराखंडमध्ये हिमकडा नदीत कोसळल्यामुळे झालेल्या दुर्घटनेत मृत्यू पावणाऱ्यांची संख्या आता 54 झाली आहे. या दुर्घटनेनंतर बेपत्ता झालेले 150 जण अजूनही बेपत्ता आहेत. चमोली जिल्ह्यात अनेक यंत्रणा या सर्वांचा शोध घेत आहेत.
तपोवन येथील उर्जा प्रकल्पाच्या बोगद्यातून आणखी 3 मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. या बोगद्यात अडकलेल्या कामगारांच्या सुटकेसाठीचे प्रयत्न गेल्या आठवड्याभरापासून अव्याहतपणे सुरू आहेत. अलकनंदा नदीला अचानक आलेल्या पूरामुळे ‘नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन’च्या तपोवन विष्णुगड उर्जा प्रकल्पाच्या बोगद्यात चिखल भरला गेल्याने या बोगद्यातील 30 पेक्षा अधिक कामगार या बोगद्यातच अडकून राहिले होते. सोमवारी आणखी तीन कामगारांचे मृतदेह सापडले आहेत. कामगारांपर्यंत पोहोचण्यासाठी बोगद्याला एक मोठे भगदाड पाडले गेले आहे. मात्र त्याचाही अद्याप काही उपयोग झालेला नाही. बोगद्यामध्ये चिखल भरून राहिलेला असल्याने या भगदाडातून कॅमेरा आत सकरवला जाऊ शकत नाही. आता मुख्य प्रवेशमार्गातूनच कामगारांच्या सुटकेवर लक्ष केंद्रीत करावे लागले आहे, असे चमोलीच्या जिल्हा दंडाधिकारी स्वाती. एस. भदौरिया यांनी वृत्तसंस्थेला सांगितले.