इंद्रायणीतील माशांचा मृत्यू ग्रामपंचायतीच्या चुकीमुळेच

जुलैअखेरपर्यंत “एसटीपी’ प्रकल्प सुरू करण्याची ग्वाही


राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाचा अहवालातून उघड

पुणे – इंद्रायणी नदीतील माशांचा मृत्यू विनाप्रक्रिया सांडपाणी थेट नदीत सोडल्यानेच झाल्याचे राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अहवालातून स्पष्ट झाले आहे. यामुळे मंडळाने देहू ग्रामपंचायतीला नोटीस दिली होती. यानंतर ग्रामपंचायतीने आपली चूक मान्य करत जुलैपर्यंत सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प (एसटीपी) कार्यान्वित करणार असल्याची ग्वाही देहू ग्रामपंचायतीने मंडळाला दिली आहे.

इंद्रायणी नदीत दहा दिवसांपूर्वी दुर्मीळ महासीर मासे हजारोंच्या संख्येत मृत अवस्थेत आढळले होते. याबाबत मंडळाकडून पाण्याचे नमुने तपासण्यात आले. यामध्ये विनाप्रक्रिया सांडपाणी थेट नदीत सोडल्याने पाण्यातील प्राणवायूचे कमी झालेले प्रमाण हे माशांच्या मृत्यूचे प्रमुख कारण असल्याचे स्पष्ट झाले आहे. याप्रकरणाची गंभीर दखल घेत, मंडळाने “देहू ग्रामपंचायतीला कारवाई का करू नये’ याबाबत विचारणा केली होती. याला उत्तर देताना ग्रामपंचायतीने प्रक्रिया प्रकल्पाचे काम सुरू असून जुलैपर्यंत परिसरातील प्रक्रिया प्रकल्प कार्यान्वित करणार असल्याची ग्वाही दिली आहे.

याबाबत मंडळाचे प्रादेशिक अधिकारी दिलीप खेडकर म्हणाले, “गेल्या काही दिवसांपासून धरणातून इंद्रायणी नदीत पाण्याचा कमी प्रमाणात होणारा विसर्ग होत होता. त्यामुळे नदीतील पाण्याचे प्रमाण कमी होते. यातच प्रक्रियाविरहित सांडपाणी थेट नदीत सोडले गेल्याने नदीतील विरघळणारे ऑक्‍सिजनचे (डीओ) प्रमाण केवळ 2.5 मिलिग्राम प्रतिमीटर इतकेच आढळले. त्यामुळे प्राणवायूची कमतरता निर्माण झाल्याने या माशांचा मृत्यू झाला आहे. इंद्रायणीतील प्रदूषणाबाबत मंडळ गंभीर असून लक्ष दिले जात आहे. लवकरात लवकर प्रक्रिया प्रकल्प न उभारल्यास कडक कारवाई केली जाईल.’

Leave A Reply

Your email address will not be published.