पवनमावळ – सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये वसलेल्या आंदर मावळ भागातील फळणे या गावातील श्रुती संजय मालपोटे हिने महाराष्ट्र लोकसेवा आयोग परीक्षेत उज्ज्वल यश संपादन केले आहे. तिची पोलीस उपनिरीक्षक पदी निवड झाली. राज्यात मुलींमध्ये तिचा तिसरा क्रमांक आला आहे. त्यामुळे मावळ परिसरातून तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
प्रतिकूल परिस्थितीत जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर आपल्या मुलीने यशाचे शिखर गाठले असल्याचे सांगताना तिच्या आई-वडिलांच्या डोळ्यांत आनंदाश्रू तरळले. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या या परीक्षेत श्रुतीला 540 पैकी 404.50 गुण संपादन करत तिने पोलीस उपनिरीक्षक पद मिळविले. श्रुतीने आपल्या गावातील पहिली महिला पोलीस अधिकारी होण्याचा बहुमान मिळविला आहे. आंदर मावळ मधील फळणे येथे त्यांचा वडिलोपार्जित शेती व्यवसाय आहे.
तिचे वडील शेती व्यवसायासह पोल्ट्री व्यवसाय करत आहेत. तसेच आजोबा बंडोबा मालपोटे हे टाकवे बुद्रुक येथील संत तुकाराम शिक्षक प्रसारक मंडळ न्यू इंग्लिश स्कूल व ज्यूनिअर कॉलेजचे उपाध्यक्ष आहेत.
श्रुतीचे अभिनंदन करण्यासाठी गावातील पहिले ते चौथीतील विद्यार्थी व शिक्षकांनी भव्य सत्कार केला. आमदार सुनील शेळके यांनी देखील तिची भेट घेऊन तिचे कौतुक करत अभिनंदन केले. त्याचबरोबर गावातील नागरिकांनी व आजूबाजूच्या विविध क्षेत्रातील मान्यवरांनी तिचे अभिनंदन करून सत्कार केला. जिद्द आणि चिकाटी असेल आणि अभ्यासात सातत्य ठेवले तर यश कोणालाही हुलकावणी देत नाही, असे श्रुतीने सांगितले.
श्रुतीचा यशस्वी प्रवास
श्रुतीचे पहिली ते चौथीपर्यंतचे शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, फळणे येथे झाले. पाचवी ते दहावीचे शिक्षण न्यू इंग्लिश स्कूल टाकवे बु. येथे झाले. अकरावी ते बारावीचे शिक्षण व्ही.पी.एस हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, लोणावळा येथे तर बी. कॉमचे शिक्षण प्रोफेसर रामकृष्ण मोरे कॉलेज, आकुर्डी येथे झाले. सप्टेंबर 2021 मध्ये तिने पूर्व परीक्षा, सप्टेंबर 2022 मध्ये मुख्य परीक्षा, फेब्रुवारी 2023 ला नाशिक येथे मैदानी चाचणी, मार्च 2023 ला मुलाखत दिली.