- तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद
- पोलिसांकडून ड्रोन कॅमेरा जप्त
तळेगाव दाभाडे (मावळ, जि. पुणे) – कारागृहातून बाहेर पडताच मिरवणुकीचा थाट मांडत दहशत पसरविण्याचा प्रयत्न करणाऱ्या गुंड गजानन ऊर्फ गज्या मारणे याच्यासह त्याच्या साथीदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फटाके फोडून तब्बल 300 वाहनांच्या ताफ्याचे ड्रोन कॅमेऱ्याच्या साह्याने चित्रीकरण केले. या प्रकरणी तळेगाव दाभाडे पोलिसांनी “ड्रोन कॅमेरा सेट’ जप्त केला असून, दहशतीचे वातावरण निर्माण केल्याने गुन्ह्याची नोंद केली आहे.
राज्यात करोनाचे संकट अद्यापही पूर्णपणे दूर झाले नाही, त्यामुळे सर्वत्र गर्दीवर बंधने आहेत असे असताना कारागृहातून सुटका झालेल्या गुंडाची मिरवणूक काढण्यात आली, हा धक्कादायक प्रकार सोमवारी (दि. 15) रात्री साडेआठच्या सुमारास समोर आला. पुणे-मुंबई द्रुतगतीवर तब्बल 300 हून अधिक वाहनांचा ताफा सोबत घेत गुंड गजानन मारणे याची त्याच्या समर्थकांनी जंगी मिरवणूक काढली.
याशिवाय गुंड गजानन मारणे हा कारागृहातून सुटून बाहेर आल्याने त्याने व त्याच्या साथीदारांनी एकत्र येत गोंधळ घातला. पुणे-मुंबई द्रुतगतीवर उर्से टोलनाका (ता. मावळ) येथे सार्वजनिक ठिकाणी दहशत निर्माण करणाऱ्या उद्देशाने बेकायदेशीर गर्दी जमवून फटाके फोडले. तसेच आरडाओरडा करून त्याचे ड्रोन कॅमेऱ्याच्या साह्याने चित्रीकरण करून दहशतीचे वातावरण निर्माण केले. या प्रकरणी पोलीस नाईक नवनाथ बाळासाहेब धायगुडे यांनी फिर्याद दिली आहे.
दरम्यान, गेल्या काही वर्षांत पुणे परिसरात टोळीयुद्धाचा भडका उडाल्याचे पाहण्यास मिळाले होते. त्या पार्श्वभूमीवर अनेक गुंडांवर पुणे पोलिसांनी मोक्का अंतर्गत कारवाई करीत कारागृहात रवानगी केली होती. याचदरम्यान अमोल बधे, पप्पू गावडे आणि आणखी एका हत्येप्रकरणी गुंड गजानन मारणे याची मोक्काअंतर्गत कारागृहात रवानगी करण्यात आली होती. या खुनातून गजानन मारणेची निर्दोष मुक्तता झाल्यावर तळोजा (नवी मुंबई) कारागृहाबाहेर त्याचे समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी सुमारे 300 हून अधिक चारचाकी वाहने कारागृहाबाहेर होती. त्यानंतर कारागृह ते थेट पुण्यापर्यंत या गाड्या घेऊन घोषणा देत मिरवणूक काढण्यात आल्याचे धक्कादायक चित्र पाहवयास मिळाले.