पुणे – अमली पदार्थ नियंत्रण कक्षाचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्या मेव्हणी अमली पदार्थ विक्रीच्या व्यवसायात सहभागी आहेत का? अशी विचारणा राज्याचे अल्पसंख्याक कल्याण मंत्री नवाब मलिक यांनी ट्विटद्वारे सोमवारी केली.
त्यांच्यावर गुन्हा दाखल झाल्याची प्रतही त्यांनी ट्विटसोबत शेअर केली आहे. मात्र त्याबाबत माहिती घेतली असता तो गुन्हा ड्रग्ज व्यवसायाशी संबंधीत नसल्याचे स्पष्ट झाले आहे. मलिक ट्विटमध्ये म्हणाले, समीर दाऊद वानखेडे तुमची मेव्हणी ड्रग्ज व्यवसायाशी संबंधित आहे का? तुम्हाला याचे उत्तर द्यावे लागेल.
कारण त्यांच्याविरुद्धचे प्रकरण पुणे न्यायालयात प्रलंबित आहे. गेल्या 13 वर्षांपासून हे प्रकरण न्यायालयात प्रलंबित आहे. त्याची पुढील सुनावणी 18 मार्च 2022 रोजी होणार आहे. सामाजिक सुरक्षा विभागाचे तत्कालीन पोलीस निरीक्षक राजेंद्र भामरे यांनी 13 ऑक्टोबर 2007 रोजी लष्कर परिसरातील हॉटेल प्लाझावर छापा टाकला होता.
यावेळी वानखेडेंच्या मेव्हणीसह जागनाथ सत्यनाथ धाने (रा. मुंबई) आणि रफनित दलजीतसिंह गोराया (रा. अंधेरी, मुंबई) यांच्याविरुद्ध बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. हा गुन्हा पिटा ऍक्टनुसार दाखल करण्यात आला, तर 14 जानेवारी रोजी शिवाजीनगर प्रथम वर्ग न्याय दंडाधिकाऱ्यांसमोर दोषारोपपत्र दाखल करण्यात आले.