नवी दिल्ली – दिल्लीतील कथित दारू घोटाळ्याप्रकरणी दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आपचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. राऊस ॲव्हेन्यू कोर्टाने आज, गुरुवारी अरविंद केजरीवाल यांना समन्स बजावले आहेत.
सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) दिलेल्या अर्जाच्या आधारे हे समन्स पाठविण्यात आले आहेत. अरविंद केजरीवाल यांना 16 मार्च रोजी न्यायालयात हजर राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
उत्पादन शुल्क धोरण 2021-22 अंतर्गत परवाने देणाऱ्या मद्य व्यापाऱ्यांकडून लाच घेतल्याचा आणि परवाने त्यांच्या आवडीच्या मद्य व्यापाऱ्यांनाच दिल्याचा दिल्ली सरकारवर आरोप आहे. मात्र, आम आदमी पक्षाने हे आरोप फेटाळून लावले आहेत.
या कथित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीने गुन्हा दाखल करत गेल्या वर्षी 2 नोव्हेंबर, 21 डिसेंबर तसेच, यावर्षी 3 आणि 18 जानेवारी, 2, 14, 22 आणि 27 फेब्रुवारी असे आठ वेळा अरविंद केजरीवाल यांना समन्स बजावले होते. मात्र हे समन्स बेकायदेशीर असल्याचे सांगत केजरीवाल आठही वेळा चौकशीसाठी हजर झाले नाहीत.