सातारा -विविध रुग्णालयात व करोना केंअर सेंटरमध्ये उपचार घेऊन करोनातून बऱ्या झालेल्या 12 जणांना शनिवारी 10 दिवसानंतर डिस्चार्ज देण्यात आला, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली. डिस्चार्ज दिलेल्यांमध्ये वाई तालुक्यातील सह्याद्रीनगर येथील 9 वर्षीय बालिका, खटाव तालुक्यातील शिरसवाडी येथील 4 वर्षीय बालिका व 32 वर्षीय महिला, माण तालुक्यातील 17 व 21 वर्षीय युवक व 39 वर्षीय पुरुष, महाबळेश्वर तालुक्यातील हरचंदी येथील 63 वर्षीय पुरुष, सातारा तालुक्यातील गोजेगाव येथील 46 वर्षीय महिला, पाटण तालुक्यातील शिराळ येथील 70 वर्षीय पुरुष, कराड तालुक्यातील तुळसण येथील 25 वर्षीय महिला व 28 वर्षीय पुरुष, 5 वर्षीय बालिकेचा समावेश आहे. कराड (प्रतिनिधी)- येथील कृष्णा हॉस्पिटलमधून शनिवारी सहा करोनामुक्त रुग्णांना टाळ्यांच्या गजरात डिस्चार्ज देण्यात आल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली. माचूतर- महाबळेश्वर येथील 31 वर्षीय महिला आणि औरंगाबाद येथील 30 वर्षीय पुरूष यांच्यासह सहा जण कृष्णा हॉस्पिटलच्या करोना विशेष कक्षात उपचार घेत होते. त्यांचे उपचारनंतरचे अहवाल निगेटिव्ह आल्याने आज त्यांना टाळ्यांच्या गजरात डिस्चार्ज देण्यात आला. या करोनामुक्त रूग्णांचा मान्यवरांच्या हस्ते पुष्पगुच्छ व प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी कृष्णा हॉस्पिटलचे वैद्यकीय संचालक डॉ. ए. वाय. क्षीरसागर, त्वचारोगतज्ज्ञ डॉ. मोहन काळे, डॉ. बाळकृष्ण निकम यांच्यासह हॉस्पिटलचे अन्य वैद्यकीय कर्मचारी उपस्थित होते. क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालयातील 50, कृष्णा मेडिकल कॉलेज कराड येथील 45, वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयातील 39, फलटणच्या उपजिल्हा रुग्णालयातील 34, वाईच्या ग्रामीण रुग्णालयातील 21, शिरवळ करोना केअर सेंटरमधील 10, रायगाव येथील 13, मायणी येथील 6 अशा एकूण 218 जणांच्या घशातील स्त्रावांचे नमुने पुण्याच्या एनसीसीएस व कृष्णा मेडिकल कॉलेजकडे तपासणीकरीता पाठविण्यात आले आहेत.