कायद्यावरुन भाजप तृणमूल संघर्ष होण्याची चिन्हे
कोलकाता – तिहेरी तलाकला गुन्हा ठरवणारा कायदा देशभरात लागू झाला असला तरी त्याचा विरोध अजुनही सुरू आहे. त्यात पश्चिम बंगालमधिल एका नेत्याने वादग्रस्त विधान करत यात भर घातली आहे. हा कायदा आपल्याला अमान्य असल्याचे ममता बॅनर्जींच्या मंत्र्याने म्हटले आहे. तिहेरी तलाक विधेयक मंजूर झाल्याबद्दल मला दु:ख वाटते. हा इस्लामवरील हल्ला आहे. त्यामुळे आम्ही तिहेरी तलाकवरील कायदा स्वीकारणार नाही, असे ममता बॅनर्जींच्या मंत्रिमंडळातील सदस्य असलेल्या सिद्दीकुल्लाह चौधरी यांनी म्हटले आहे. यावरुन मोठा राजकीय वादंग निर्माण होण्याची शक्यता आहे.
पश्चिम बंगालचे मंत्री असलेले सिद्दीकुल्लाह चौधरी जमियत उलेमा-ए-हिंदचे अध्यक्ष आहेत. तिहेरी तलाक कायद्याला स्पष्ट विरोध असल्याचे चौधरी म्हणाले. यावर केंद्रीय समितीची बैठक झाल्यास आम्ही पुढील कारवाईचा विचार करू, अशा शब्दांमध्ये त्यांनी पुढील भूमिका स्पष्ट केली. तिहेरी तलाकच्या मुद्द्यावरुन भाजपानं तृणमूलच्या सर्वेसर्वा आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींना लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे. त्यात आता चौधरी यांच्या विधानामुळे भाजपा अधिक आक्रमक होण्याची शक्यता आहे.