नगर -कोणत्याही कारखान्याच्या प्रगतीमधे तेथील कामगारांचे योगदान अतिशय मोलाचे असते. तोच खरा व्यवस्थापनाचा मानबिंदू असतो, असे प्रतिपादन क्लासिक व्हील्स लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक सुनील मुनोत यांनी केले.
करोना रोगाच्या नियंत्रणासाठी कारखान्यातील एक हजार कामगार, कर्मचारी व त्यांच्या कुटुंबीयांना मुनोत यांच्या हस्ते रोगप्रतिकारक शक्ती असलेल्या होमिओपॅथिक औषधांचे वाटप करण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते.
कारखान्याचे संचालक सुमित मूनोत, कुशल मुनोत, प्रसिद्ध होमिओपॅथिक तज्ञ डॉ. सचिन मुनोत, सरव्यवस्थापक के. गोपीनाथन, प्रकल्प व्यवस्थापक लक्ष्मण कराळे आदी यावेळी उपस्थित होते.
मुनोत म्हणाले, “”करोना विषाणू संसर्गामुळे सगळे जग संकटात सापडले आहे. या रोगातून मुक्ती मिळविण्यासाठी संपूर्ण देश प्रयत्न करीत आहे. त्यासाठी आखून दिलेल्या नियमांचे पालन करणे आपले कर्तव्य आहे. मात्र, या काळात रोगप्रतिकारक शक्ती वाढावी. या हेतूने औषधांचे वाटप करण्यात येत आहे.” संकटकाळात व्यवस्थापन कर्मचाऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहील, अशी ग्वाही संचालक सुमित मुनोत व कुशल मुनोत यांनी दिली.