नवी दिल्ली – राज्यसभा उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत संयुक्त उमेदवार देण्याचा निर्णय विरोधी पक्षांनी घेतला. तसेच, राजदचे नेते मनोज झा यांची उमेदवारीही निश्चित केली.
राज्यसभा उपाध्यक्षपदाची निवडणूक 14 सप्टेंबरला होणार आहे. त्यासाठी सत्तारूढ एनडीएने पुन्हा जेडीयूचे नेते हरीवंश यांना उमेदवारी दिली आहे. ती निवडणूक बिनविरोध होऊ न देण्यासाठी संयुक्त उमेदवार रिंगणात उतरवण्याचा निर्णय कॉंग्रेस आणि इतर विरोधी पक्षांनी घेतला. त्यानंतर झा यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब करण्यात आले. ते उद्या (शुक्रवार) उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.
त्यावेळी विरोधक ऐक्याचे दर्शन घडवणार असल्याचे समजते. त्याचाच भाग म्हणून अर्ज दाखल करताना झा यांच्यासमवेत गुलाम नबी आझाद, आनंद शर्मा आणि जयराम रमेश हे कॉंग्रेस नेते उपस्थित राहणार आहेत. त्याशिवाय, तृणमूल कॉंग्रेस, द्रमुक, आप आणि डाव्या पक्षांचे नेतेही उपस्थित राहण्याची शक्यता आहे.
संसदेच्या पावसाळी अधिवेशनात मोदी सरकारविरोधात एकवटण्याची रणनीती विरोधकांनी आखली आहे. त्याचाच भाग म्हणून राज्यसभा उपाध्यक्ष निवडणुकीत संयुक्त उमेदवार देण्याच्या निर्णयाकडे पाहिले जात आहे.