वंचितकडे कॉंग्रेसने किंचितही लक्ष दिले नाही

शंकर दुपारगुडे /कोपरगाव: देशाच्या राजकारणामध्ये आमूलाग्र बदल होऊन 2019 च्या लोकसभा निवडणुकीमध्ये मोदी-शहा जोडीने राजकीय घोडेबाजारात मोठी मुसंडी मारून केंद्रात भाजपची एक हाती सत्ता काबीज केली. वर्षानुवर्षे महाराष्ट्रामध्ये सत्ता भोगलेल्या कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांचा या लोकसभा निवडणुकीत दारुण पराभव झाला. कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या अनेक उमेदवारांच्या पराभवाला वंचित आघाडीचे उमेदवार कारणीभूत ठरले.

बहुजन वंचित आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांच्या निवडणूकपूर्व बैठकांकडे कॉंग्रेसच्या नेत्यांनी दुर्लक्ष केले. वर्षानुवर्षे कॉंग्रेसला मतदान करून बहुजनांनी सत्तेमध्ये ठेवले. मात्र नेत्यांच्या अंतर्गत वादामध्ये बहुजन समाज वंचितच राहीला. अखेर 2019 च्या लोकसभा निवडणुकीमध्ये प्रकाश आंबेडकर यांनी वंचित बहुजन आघाडीची स्थापना करून वंचित आघाडीसाठी राज्यात लोकसभेच्या जागांची मागणी कॉंग्रेस नेत्यांकडे केली. आंबेडकर यांच्या बहुजन वंचित आघाडीकडे किंचितही लक्ष दिले नाही. केवळ चर्चावर चर्चा करून उमेदवारी जाहीर करण्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत दुर्लक्ष करीत राहीले. परिणामी बहुजन वंचित आघाडीच्या नेत्यांनी राज्यातील 48 लोकसभा मतदारसंघांमध्ये वंचितच्या उमेदवारांची नावे जाहीर केले. इतका निर्णय पुढे गेला तरीही कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांनी त्याकडे गांभीर्याने पाहिले नाही.

अखेर लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर वंचित आघाडीच्या उमेदवारांमुळे कॉंग्रेसच्या दिग्गज नेत्यांचा दारुण पराभव झाल्याचे दिसून आले. जर वंचितकडे निवडणुकीपूर्वीच किंचित लक्ष दिले असते, तर कॉंग्रेसचे दोन माजी मुख्यमंत्री, माजी प्रदेशाध्यक्ष, अनेक माजी मंत्र्यांचा दारुण पराभव झाला नसता. वंचित आघाडीला मिळालेल्या मतांमुळे कॉंग्रेसचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना 4 लाख 46 हजार 658 मते मिळाली. वंचित आघाडीचे यशपाल भिंगे यांना 1 लाख 66 हजार 196 मते मिळाली. भाजपचे प्रतिस्पर्धी प्रतापराव चिखलीकर यांना 4 लाख 86 हजार 806 मते मिळाली. चिखलीकर हे 40 हजार 148 मतांनी विजयी झाले. सोलापूरमधून कॉंग्रेसचे माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांना 3 लाख 66 हजार 377 मते मिळाली. वंचितचे प्रकाश आंबेडकर यांना 1 लाख 70 हजार मते मिळाली, तर भाजपचे जयसिद्धेश्‍वर शिवाचार्य यांना 5 लाख 24 हजार 985 मते मिळाली.

जयसिद्धेश्‍वर यांचा 1 लाख 58 हजार 608 मतांनी विजय झाला. हातकणंगले मतदारसंघामध्ये राजू शेट्टी यांना 4 लाख 89 हजार 737 मते मिळाली. वंचित आघाडीचे अस्लम सय्यद यांना 1 लाख 23 हजार 419 मते मिळाली, तर शिवसेनेचे उमेदवार धैर्यशिल माने यांना 5 लाख 85 हजार 776 मते मिळाली. माने यांचा 96 हजार 39 मतांनी विजय झाला. यवतमाळ-वाशिममधून कॉंग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांना 4 लाख 24159 मते मिळाली, तर वंचित आघाडीचे प्रवीण पवार यांना 94 हजार 228 मते मिळाली. शिवसेनेच्या भावना गवळी यांना 5 लाख 42 हजार 98 मते मिळली. गवळी या 1 लाख 17 हजार 939 मतांनी विजयी झाल्या. सांगलीमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे विशाल पाटील यांना 3 लाख 44 हजार 643 मते मिळाली. वंचित आघाडीचे गोपीचंद पडळकर यांना 3 लाख मते मिळाली. भाजपचे संजय काका पाटील यांना 5 लाख 8 हजार 995 मते मिळाली. पाटील हे 1 लाख 64 हजार 352 मतांनी विजयी झाले. औरंगाबादमध्ये कॉंग्रेसचे सुभाष झांबड यांना 91 हजार 789 मते मिळाली. शिवसेनेचे चंद्रकात खैरे यांना 3 लाख 84 हजार 550 मते मिळाली, तर बहुजन वंचित आघाडीचे इम्तियाज जलील यांनी 3 लाख 89 हजार 42 मते मिळून वंचित आघाडीचा पहिला खासदार होण्याचा मान मिळविला.

राज्यातील बीड, गडचिरोली, बुलढाणा, परभणी या मतदारसंघातील कॉंग्रेसच्या उमेदवारांचा पराभव वंचित आघाडीच्या उमेदवारांमुळे झाला. अनेक ठिकाणी वंचित आघाडीच्या उमेदवारांनी तिसऱ्या स्थानावर मते मिळवित वंचितने आपली ताकद दाखविण्याचा प्रयत्न केला. राज्यातील 48 मतदारसंघांतून वंचित आघाडीला 42 लाख 32 हजार इतकी मते मिळाली. यावरून वंचित आघाडीचा हा फॅक्‍टर कॉग्रेस-राष्ट्रवादीला दलित-मुुस्लिम मतांच्या फुटीमुळे धोकादायक ठरला.

वंचित बहुजन आघाडीने आपले उमेदवार निवडून येण्यापेक्षा दुसऱ्यांना पाडण्यासाठीच उभे केले असल्याचे चित्र अनेक ठिकाणी दिसून आले. त्यामुळे राज्यातील बड्या-बड्या नेत्यांना व त्यांच्या भावी पिढीला पराभवाची चव चाखण्याची वेळ आली.

राष्ट्रीय पक्षाच्या बरोबरीने वंचित आघाडीला यश मिळाले. अनेक वर्षे सत्ता भोगलेल्या कॉंग्रेसला महाराष्ट्रातून केवळ एका जागेवर विजय मिळविता आला. तर 11 महिन्यांपूर्वी स्थापन झालेल्या बहुजन वंचित आघाडीने आपला एक खासदार निवडून आणत कॉंग्रेसच्या अनेक उमेदवारांच्या पराभवाला कारण ठरले. काही मतदारसंघांमध्ये तिसऱ्या क्रमांकाची मते घेऊन वंचितने आपला किंचित करिष्मा दाखविला.

प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित आघाडीत 12 बलुतेदारांपैकी किंचितच लोकांचा समावेश झालेला आहे. आगामी काळात राज्यातील 12 बलुतेदार एक जिवाने एकत्र आले, तर वंचित आघाडीची ताकद अधिक वाढेल. कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्यांनी यापुढे यांच्याकडे दर्लक्ष केले तर लोकसभेपेक्षाही बिकट परीस्थिती होण्यास वेळ लागणार नाही. अशी चर्चा जानकार राजकीय विश्‍लेषकांमध्ये सुरू झाली आहे.

2019 च्या या निवडणुकीमध्ये वंचित आघाडीचा फायदा भाजप-सेनेला सर्वाधिक झाला. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी घेतलेल्या सभा राज्यात प्रभावी झाल्या. पण त्याचा फायदा कॉंग्रेसला मतांमधून झाला नाही. आगामी निवडणुकांमध्ये वंचितची ताकद यापेक्षा किंचित वाढली, तर विजयी उमेदवारांची संख्या अधिक दिसू शकते. एका बाजूला देशात मादींची लाट दिसत असली, तरी कॉंग्रेसला भविष्यात सत्ते यायच असेल, तर वंचित आघाडीला किंचितही दुर्लक्षक करून चालणार नाही.

Leave A Reply

Your email address will not be published.