अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या संपाने पुणे विद्यापीठ बंद

पुणे – “सातवा वेतन आयोग लागू करावा, तसेच सेवांतर्गत आश्‍वासित प्रगती योजनेचा रद्द केलेले परिपत्रक मागे घ्यावे’ आदी मागण्यांसाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी शनिवारी एक दिवसीय काम बंद आंदोलन केले. राज्य शासनाने याबाबत तातडीने निर्णय न घेतल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा विद्यापीठातील कर्मचाऱ्यांनी दिला आहे.

राज्यातील सर्व विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना सातवा वेतन लागू करण्यात आला आहे. मात्र, राज्यातील अकृषी विद्यापीठातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना अद्यापही सातवा वेतन लागू नाही. त्यामुळे या कर्मचाऱ्यांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली आहे.

या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी पुणे विद्यापीठातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी शनिवारी काम बंद आंदोन केले. यापूर्वी आंदोलनचा पहिला टप्पा म्हणून विद्यापीठातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती लावून काम केले. त्यानंतर निदर्शन केली. एवढेच नव्हे, तर उच्च शिक्षण विभागाच्या पुणे विभागीय सहसंचालक कार्यालवर मोर्चा काढला. शनिवारी सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मुख्य इमारत येथे एकत्र आले होते. यावेळी अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या संपामुळे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कार्यालयात आले नव्हते. त्यामुळे आज विद्यापीठ सुरू असून कोणतेही कामकाज होऊ शकले नाही.

Leave A Reply

Your email address will not be published.