हॅनॉय शहर रिकामे होत चालले

ता. 13, माहे मे, सन 1972

निम्मे रहिवाशी बाहेर पडले

टोरोन्टो, ता. 12 – हॅनॉय शहर रिकामे केले जात आहे, अशी बातमी कॅनेडियन नभोवाणी महामंडळाच्या जो शेलेसिंगर या अतिपूर्वेकडील बातमीदाराने काल दक्षिण व्हिएतनाममधून दिली आहे. हॅनॉयमधून नुकत्याच बाहेर पडलेल्या एका व्यक्‍तीने सांगितले की, शहरातील निम्मे रहिवाशी शहर सोडून गेले आहेत आणि दररोज आणखी रहिवाशी बाहेर पडत आहेत. गेल्या आठवड्यात अमेरिकेने तुफानी बॉम्बहल्ले केले होते.

भटक्‍या व विमुक्‍त जातींनाही सवलती द्या
पुणे – राज्य शासनातर्फे हरिजन-गिरिजन यांना ज्या सवलती मिळतात त्या सर्व सवलती भटक्‍या व विमुक्‍त जमातींनाही देण्यात याव्यात, अशी सरकारला विनंती करणारा ठराव महापालिकेने काल संमत केला. ठकसेन पाडळे यांनी मांडलेला हा ठराव मंजूर करण्यात आला.

परिचारिकांनी समर्पितभावनेने सेवा करावी
नवी दिल्ली – परिचारिकांनी समर्पित भावनेने सेवा करावी व समाजाच्या आरोग्यविषयक किमान गरजा पूर्ण करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करावेत, असे आवाहन केंद्रीय आरोग्य व कुटुंब नियोजन खात्याचे राज्यमंत्री प्रा. डी. पी. चटोपाध्याय यांनी केले. भारतासारख्या विकसनशील देशात 80 टक्‍के लोक खेड्यात राहतात. अशा ठिकाणच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात व ग्रामीण रुग्णालयात प्रशिक्षित परिचारिका पाठविण्याची गरज आहे.

आश्‍वासने पूर्ण करण्यासाठीराज्य-केंद्राचे सहकार्य हवे
नवी दिल्ली – जमीनविषयक सुधारणा कायद्यांची द्रुतगतीने अंमलबजावणी होण्यासाठी केंद्र आणि राज्यांची समन्वयवादी भूमिका हवी, असे पंतप्रधान इंदिरा गांधी म्हणाल्या. हा प्रश्‍न जबाबदारी टाळण्याचा नाही. जनतेला दिलेली आश्‍वासने सामुदायिक प्रयत्न करून पूर्ण केली पाहिजेत.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.