Ganpat Gaikwad Firing : भाजपा आमदार गणपत गायकवाड यांनी शिंदे गटाचे नेते महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केला. उल्हासनगर येथील हिललाइन पोलीस स्टेशनमध्येच हा प्रकार घडल्याने राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. दरम्यान, या घटनेनंतर गणपत गायकवाड यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंमुळे मी गोळीबार केला असल्याचे गंभीर आरोप केले आहेत. याच पार्श्वभूमीवर आता राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.
जमिनीच्या वादातून गणपत गायकवाड यांनी महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केला असल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेत महेश गायकवाड गंभीर जखमी झाले आहेत. या प्रकरणी भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्यासह हर्षल केणी आणि संदीप सर्वणकर या तिघांना अटक करण्यात आली आहे. यानंतर उल्हासनगर गोळीबार प्रकरणाची गंभीर दखल घेत राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेचे उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले आहेत.
गणपत गायकवाड यांनी केलेल्या या गोळीबाराच्या घटनेच्या तपासासाठी एसीपी नीलेश सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली गुन्हे शाखेची एसआयटी स्थापन करण्यात आली असल्याची माहिती समोर येत आहे.
दरम्यान, द्वारली गावात एका भूखंडावरून हा वाद निर्माण झाला होता. त्यावेळी महेश गायकवाड आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी गणपत गायकवाड यांचे पुत्र वैभव गायकवाड यांना धक्काबुक्की केली होती. याची तक्रार देण्यासाठी वैभव गायकवाड हे पोलीस स्टेशनमध्ये आले होते त्यावेळी महेश गायकवाड यांच्या कार्यकर्त्यांकडून वैभव गायकवाड यांच्या शाब्दिक चकमक झाली. त्यानंतर वैभव गायकवाड यांनी वडील भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांना हिललाईन पोलीस ठाण्यात बोलावून घेतले. त्यावेळी गणपत गायकवाड यांच्या मागे महेश गायकवाड यांचे समर्थकही पोहचले. हिललाईन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल जगताप यांच्या समोर दोन्ही गट बसलेले असताना हा गोळीबार झाल्याचे सांगण्यात येत आहे.